निर्घृण खुनाने खराळवाडी हादरले

0

पिंपरी-चिंचवड : राजकीय वैमनस्यातून 12 जणांच्या टोळक्याने एका युवकाचा डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून निर्घृण खून केला. ही घटना पिंपरीतील खराळवाडीत असलेल्या दुर्गामाता मंदिराजवळ रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. सुहास बाबुराव हळदणकर (वय 35, रा. दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी, स्पाईन रोड, चिखली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी काँग्रेसचे माजी नगरसेवक सद्गुरू कदम यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली. या टोळक्याविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, अटकेतील संशयित आरोपींना न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अटकेतील संशयित आरोपी असे…
या खूनप्रकरणी पोलिसांनी काळ्या उर्फ संदीप कलापुरे (वय 30), प्रतुल घाडगे (36), अभिजित कलापुरे (28), काँग्रेसचे माजी नगरसेवक सद्गुरू कदम (45), दत्ता उर्फ फेट्या कलापुरे (25), प्रवीण कदम उर्फ झिंगर्‍या (28), खंड्या उर्फ प्रवीण सावंत (26), गणेश जाधव (25), छोट्या पठाण (28), संतोष उर्फ बाब्या कदम (28), संतोष उर्फ मुंड्या आरबेकर (40), सतीश कदम (वय 31, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित गणेश जाधव सोडून सर्वांना अटक केली आहे.

सुहास यांचा उपचारापूर्वीच मृत्यू
रविवारी रात्री दहाच्या सुमारास सुहास हळदणकर हे उर्दू शाळेजवळ दुर्गामाता मंदिरासमोर त्यांच्या मित्रांसमवेत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी 12 जणांचे टोळके त्या ठिकाणी आले. त्यांनी मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी असलेले सिमेंट ब्लॉक आणून हळदणकर यांच्या डोक्यात घातले. या घटनेनंतर टोळक्यातील सर्व जण पसार झाले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हळदणकर यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.

पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार
महापालिका निवडणुकीच्या काळात सुहास हळदणकर यांचा संशयित आरोपींशी वाद झालेला होता. या वादातून त्यांचा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सुहास यांचा खून झाल्याची माहिती होताच, संतप्त जमावाने किरकोळ दगडफेक केली. त्यामुळे खराळवाडीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती होताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संतप्त जमावाची पांगवापांगव केली. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर जमावाने दगडफेक केल्याच्या वृत्ताचा पोलिस अधिकार्‍यांनी इन्कार केला. परंतु, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दगडफेक झाली आहे.

पोलिसांकडून तातडीने अटकसत्र
पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपासचक्रे फिरवून अटकसत्र राबवले. त्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक सद्गुरू कदम यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली. अटकेतील संशयित आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 17 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या खूनप्रकरणात अटकेत असलेले सर्वजण सद्गुरू कदम यांचे कार्यकर्ते आहेत. सुहासदेखील कदम यांचे कार्यकर्ते होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांंची साथ सोडली होती. त्यानंतर बालभवन येथे असणारे सुरक्षारक्षक हटविण्यात यावे, अशी मागणी सुहास हळदणकर यांनी केली होती. हे सुरक्षारक्षक कदम यांचे कार्यकर्ते होते. याच रागातून सुहास यांचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

खराळवाडीकरांचा मोर्चा
या घटनेनंतर खराळवाडीतील नागरिकांनी, खूनप्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करावी, तसेच खराळवाडीत पोलिस चौकी उभारण्यात यावी, या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. नागरिकांनी या मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलिस आयुक्त राम मांडुरके यांना दिले. पोलिसांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर मोर्चेकर्‍यांनी आपला संतप्त पवित्रा मागे घेतला.