निरक्षर वृद्धेला भाच्याने घातला सोळा लाखांचा गंडा

0
फसवून घेतले अंगठ्याचे ठसे
पिंपरी-चिंचवड : निरक्षर वृद्ध महिलेचा विश्‍वास संपादन करून तिच्या हाताच्या अंगठायचे ठसे घेऊन भाच्याने 16 लाख 52 हजार रुपयांचा अपहार केला. हा प्रकार 2014 ते 2016 च्या सुमारास घडला. याबाबत वृद्ध महिलेने बुधवारी (दि. 3) तक्रार दिल्याने घटनेनंतर दोन वर्षांनी हा प्रकार दाखल करण्यात आला आहे. बय्यो शिवराम रावळकर (वय 58, रा. सिनेरी चाळ, भीमनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भाचा विशाल बच्चू तामचीकर (रा. भाटनगर, पिंपरी), विनायक विजय गागडे (रा. भाटनगर, येरवडा) आणि शशिकांत बागडे (रा. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमा पॉलिसी केली हडप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा रावळकर यांचा भाचा आहे. मागील काही वर्षांपूर्वी रावळकर यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या विमा पॉलिसीचे पैसे रावळकर यांना मिळणार होते. या पैशांवर त्यांच्या भाच्याचा डोळा होता. त्याने रावळकर यांचा विश्‍वास संपादन करून काही कागदपत्रांवर त्यांच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे घेतले. त्यातून त्याने रावळकर यांच्या मुलाच्या मृत्यू पश्‍चात मिळणार असलेले विमा पॉलिसीचे एकूण 16 लाख 52 हजार रुपये हडप केले. यानंतर काही दिवसांनी रावळकर यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी बुधवारी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शिवाजी भुजबळ तपास करीत आहेत.