नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवणार

0

मुंबई – शेतकर्‍यांनी सहकारी बँका, क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी, पतसंस्था या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत ३० जून पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली. यावर सकारात्मकता दाखवून याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल व शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले. आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महिने रेशनकार्ड वर धान्य मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यात अनेक मजूर, गरीब नागरिकांकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सर्व गरीब गरजूंना तीन महिने मोफत धान्य उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

केंद्र सरकारने शासकीय रूग्णालयांमधील वैद्यकिय अधिकार्‍यांना व नर्सेसना विमा संरक्षण कवच जाहीर केले असले तरीही खाजगी रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, नर्सेस व सफाई कर्मचा-यांना तसेच कंत्राटी तत्वावर स्वच्छतेची कामे करणार्‍या घटकांना, पोलिसांना यांनाही हे कवच मिळण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांकडे केली.

Copy