निमखेडीतील नायब सुभेदाराला वीर मरण

मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी येथील मूळ रहिवासी तथा सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असणारे विपीन जनार्दन खर्चे यांना वीरगती प्राप्त झाली आहे. निमखेडी पोलिस पाटील रवींद्र कांडेलकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

वाहन दरीत कोसळल्याने वीर मरण
नायब सुभेदार विपीन खर्चे हे जम्मू काश्मीर मधील उधमपूर येथे सेवेत होते. सैन्याचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे. विपीन हे गेल्या पंधरा वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झाल्याचे सांगण्यात आले. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले त्यातच सोमवारी एकुलत्या एक मुलालाही वीरमरण आल्याने आईने हंबरडा फोडला. मयत विपीनच्या पश्चात पत्नी रुपाली (30), मुलगी स्वरा (8), मुलगा आरव (5) असा परीवार आहे. सोमवारी रात्री उशिरा निमखेडी येथे जवानाचा मृतदेह आणण्यात येणार असून मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंकार होणार असल्याची माहिती आहे.