निधीचे योग्य नियोजन करून कामे करा : माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील

पाळधी येथे विविध विकासकामांचे भूमिपुजन ; निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही

पाळधी/ धरणगाव/ जळगाव : पाळधी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांच्या निधीसाठी आपण आजवर कमतरता पडू दिली नसून दोन्ही गावच्या लोकप्रतिनिधींनी विविध योजनांचे अचूक नियोजन करावे असे आवाहन माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथील ७६ लाख रूपयांच्या कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमात बोलत होते. या कामांमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, शौचालय बांधकाम आदींचा समावेश आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, माजी पालकमंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते आज पाळधी बुद्रुक या गावातील विविध कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यामध्ये पंधराव्या वित्त आयोगातून ५६ लाखांचे ४ कामे तर मुलभूत सुविधा म्हणजेच २५/१५ अंतर्गत ३० लाखांची २ कामे अशा एकूण ७६ लाख रूपयांच्या ६ कामांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, पाळधी बुद्रुकच्या सरपंच प्रकाश पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, गट विकास अधिकारी एस. ए. पाटील, बांभोरी प्र. चा. सरपंच सचिन बिर्‍हाडे, उपसरपंच चंदन कळमकर, ग्रामपंचायत सदस्य तुषार मोरे, राजाराम कोळी, अकबर खान, उदय झंवर, माजी सरपंच सोपन पाटील, नारायणआप्पा सोनवणे, बांभोेरीचे उपसरपंच चेतन नन्नवरे, स्कूल कमिटीचे चेअरमन संजय महाजन, मच्छूनाना सपकाळे, माजी सरपंच अरूण पाटील, युवा सेनेचे आबा माळी, ग्रामविकास आधिकारी डी. डी. पाठक, मुख्याध्यापक चंदा रवंदळे, उपशिक्षक नबाब सर यांच्यासह दोन्ही गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महाजन यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी केले. आभार उपशिक्षिका मनीषा शिरसाट यांनी मानले.

याप्रसंगी आ. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधी बुद्रुक येथे महिलांसाठी शौचालय बांधकाम : ३० लाख; जि.प. मराठी शाळेत पेव्हर ब्लॉक बसविणे : ०८ लाख; पाण्याची टाकी परिसरात कॉंक्रिीटीकरण करणे : ८ लाख; देवकर कॉलनी परिसरात रस्ता कॉंक्रीटीकरणे करणे १० लाख; गोकुळ धनगर ते सार्वजनीक शौचालय या भागात रस्ता कॉंक्रीटीकरण १० लाख आणि भवानी माता मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक : १० लाख या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. *याप्रसंगी आ. गुलाबराव पाटील म्हणाले की, गावातील विकासकामे करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या समन्ययातून विकासाला गती मिळत असते. या तिन्ही घटकांनी योग्य नियोजन केल्यास निधीची कोणतीही कमतरता राहत नाही. आधी ग्रामपंचायतींना मर्यादीत निधी येत होता. मात्र अलीकडच्या काळात वित्त आयोगाच्या माध्यमातून चांगला आणि थेट निधी मिळत असून यामुळे ग्रामविकासाला गती मिळाली असल्याचे आ. गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक या दोन्ही गावांच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही देखील आमदार गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.