Private Advt

निकृष्ट पोषण आहाराच्या तक्रारीनंतर भुसावळात गोदाम सील

वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारीची गटशिक्षणाधिकार्‍यांकडून दखल ः नमूने तपासणीच्या अहवालानंतर होणार कारवाई

भुसावळ : शहरातील तु.स.झोपे शाळेत विद्यार्थ्यांना वाटप होणार्‍या शालेय पोषण आहारात सावळा-गोंधळ सुरू असल्यासह वाटप होणार्‍या दाळींसह तांदळाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचा आरोप गुरुवार, 5 मे रोजी वंचित बहुजन आघाडीने गटशिक्षण अधिकारी किशोर वायकोळे व विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांच्याकडे लेखी तक्रार करून नोंदवल्यानंतर अधिकार्‍यांनी लागलीच तु.स.झोपे शाळा गाठून गोदामाला सील लावले. पोषण आहार अधीक्षकांच्या उपस्थितीत गोदामातील धान्याची तपासणी करण्यात येणार असून नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर येणार्‍या अहवालाअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

पोषण आहारात गोलमाल होत असल्याचा आरोप
भुसावळ शहरात शालेय पोषण आहार वाटपात मोठ्या प्रमाणावर गोलमाल होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकारात संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप भुसावळ शहरामध्ये विद्यार्थ्यांना होत असल्याने दोषींवर कारवाईची मागणी वंचितचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व पदाधिकार्‍यांनी केली आहे. शहरातील तु.स.झोपे विद्यालयात गुरुवारी अत्यंत सुमार दर्जाचा पोषण आहार वाटप केला जात असल्यासह अंदाजे विद्यार्थ्यांच्या पालकांना तांदुळासह दाळी दिल्या जात असल्याची तक्रार वंचित आघाडीने शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे व सहकार्‍यांनी संबंधित शाळा गाठून गोदामाची पाहणी करीत वरीष्ठांशी संवाद साधला. पोषण आहार अधीक्षक नसल्याने तूर्त गोदामाला सील लावण्यात आले आहे.

चौकशीअंती होणार कारवाई : वायकोळे
पोषण आहार अधीक्षक अजीत तडवी हे बाहेर असल्याने तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली. तूर्त शाळेच्या गोदामाला सील लावण्यात आले असून तडवी आल्यानंतर ते धान्याचा पंचनामा करून नमूने तपासणीसाठी जिल्हा स्तरावर पाठवतील व त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, असे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी सांगितले. दोषी कुणीही असलातरी कारवाई निश्चित होईल, असेही ते म्हणाले.

कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन
गोदामाला सील लावतेवेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, भुसावळ तालुका सचिव गणेश इंगळे, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, शिवाजीराव टेंभुर्णीकर, बंटी सोनवणे व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. दरम्यान, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार्‍या अधिकार्‍यांसह दोषी कंत्राटदारावर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी सांगितले.