निकालापुर्वीच्या चिंता

0

निवडणूकीचा प्रचार तर संपला. पण या निमीत्ताने युतीतील भांडण आणखी विकोपाला गेलेले आहे. आणखी ४८ तासात मतदानही संपलेले असेल आणि चार दिवसांनी निकालही लागणार आहेत. ते निकाल कसे असतील, याचा आजतरी कोणालाच अंदाज नाही. पण जे काही निकाल लागतील, त्यावर पुढल्या काळातील महाराष्ट्राचे राजकारण विसंबून असणार याबद्दल प्रत्येकजण निश्चींत आहे. म्हणूनच कुठल्याही बाजूने निकाल लागला तरी आपण त्यावेळी काय करायचे, याचा विचार सर्वच पक्ष आतापासून करू लागले आहेत. म्हणजे स्वबळावर लढण्याची खुमखुमी असलेल्या भाजपाने विधानसभेची बाजी मारली होती. आताही तसेच निकाल लागले, तर भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून मिरवता येईलच. पण शिवसेनेला अधिक खिजवताही येईल. फ़ार कशाला राजिनामे टाकून चालते व्हा; असेही आव्हान सेनेचे मंत्री व नेतृत्वाला देता येईल. पण निकाल अपेक्षेइतके लागले नाहीत, तर मात्र भाजपाला मोठा पक्ष म्हणून मिरवण्याची सोय शिल्लक उरणार नाही. किंबहूना विधानसभा व लोकसभेत संपादन केलेली लोकप्रियता ओसरू लागल्याचे लक्षण म्हणून बचावात्मक भूमिकेत जावे लागेल. तेव्हा सरकार टिकवण्याची कसरत करण्याखेरीज पर्याय उरत नाही. म्हणूनच तसा अपेक्षाभंग झाल्यास सावरासावर कशी करायची, त्याची चिंता भाजपाला आता सतावत असेल. कारण एकप्रकारे युतीशिवाय स्वबळावर लढण्याचा जुगारच त्याही पक्षाने खेळला आहे. त्याला जुगार इतक्यासाठी म्हणायचे, की सत्ता गमावण्याचा धोका त्यांनी पत्करला आहे. शिवसेनेला सत्तेत फ़ारसे स्थान नसल्यामुळे तिला गमावण्यासारखे फ़ारसे काही नाही. कॉग्रेस व राष्ट्रवादी तर सत्तेतून बाहेरच फ़ेकले गेले आहेत. म्हणूनच सत्ता टिकवणे व लोकप्रियता कायम असल्याचे सिद्ध करणे, हे भाजपा पुढले आव्हान आहे.

दुसरा जोमातला पक्ष आहे शिवसेना! त्यांनीच युती तोडण्याचा निर्णय यावेळी पुढाकार घेऊन जाहिर केला. त्यामुळेच एकट्याच्या बळावर मुंबई महापालिकेची सत्ता संपादन करणे, किंवा किमान सर्वात मोठा पक्ष होऊन भाजपाच्या मदतीशिवाय पालिकेत हुकूमत कायम राखणे; हे सेनेसमोरचे निर्णायक आव्हान आहे. कारण त्यामध्ये अपयश आले, तर मुंबई शिवसेनेची, ही मस्ती दाखवायला कारण शिल्लक उरणार नाही. ती सेनेसाठी नामुष्की असेल. त्यात गमावण्यासारखे भाजपापाशी काहीच नाही. कारण पालिका पातळीवर तरी भाजपा हा नेहमीच छोटा वा दुय्यम पक्ष राहिलेला आहे. विधानसभेत सेनेपेक्षा एक आमदार जास्त आल्याने भाजपाला मुंबईत मोठा पक्ष होण्याची संधी मिळाली होती. ते अपयश पुसून टाकण्यासाठीच सेनेला स्वबळावर मुंबई पादाक्रांत करायची आहे. अर्थात मुंबईत भाजपाला छोटा करणे सेनेला एकूण राज्यातही मोठा व्हायला लाभदायक ठरू शकणार आहे. म्हणूनच नुसती मुंबई जिंकली म्हणजे विषय संपत नाही. मुंबई स्वबळावर जिंकली तर राज्यातील सत्तेत भागी किती दिवस ठेवायची; याचाही निर्णय सेनेला घ्यावा लागेल. म्हणजे आहे तशीच युती चालू ठेवायची, की सौदेबाजी करून सत्तेतला अधिक हिस्सा पदरात पाडून घ्यायचा; याचाही विचार सेनेला आतापासून करणे भाग आहे. सत्तेत अधिक हिस्सा मागायचा तर किती व कोणता, त्याचाही विचार करावा लागेल. पण आता अधिक हिस्सा मागून युती कायम राखायची, की सत्तेतून बाहेर पडून भाजपा सरकार पाडायचे; असाही दुसरा विचार करणे भाग आहे. कारण भाजपाला मुंबईत अपेक्षित यश मिळाले नाही, तर त्या पक्षाला सत्तेसाठी कसरत करणे भाग आहे. त्याचा लाभ सत्तेत राहून मिळेल, की सत्तेतून बाहेर पडून जास्त असेल, याचाही हिशोब सेनेला काळजीपुर्वक करावा लागणार आहे. कारण त्यावरच महाराष्ट्रातील सेनेची शक्ती अवलंबून असणार आहे.

मुंबई सेनेने स्वबळावर जिकली नाही, तर राज्यातही सेनेला मान खाली घालूनच राजकारण करावे लागणार आहे. कारण राजिनामे खिशात असल्याची टोकाची भाषा करून सेनेने आपण मोठा जुगार खेळत असल्याचे मतदाराला भासवलेले आहे. अशा स्थितीत उद्या पालिकेच्या सत्तेत भाजपाला सहभागी करून घेणेही सेनेला त्रासाचे ठरू शकते. कारण सर्वात मोठा पक्ष होऊनही वा बहूमत मिळूनही भाजपाशी युती कायम राखली, तर ठामपणे सेनेच्या पाठीशी उभा राहिलेल्या मतदाराचा भ्रमनिरास होऊ शकतो. सेनेला ते चालणार आहे काय? त्यामुळेच सेनेसाठी मुंबई जिंकली वा अपेक्षित यश मिळाले नाही, तरी चिंतेचाच विषय आहे. कारण पुढल्या राजकारणात युती व भाजपा अशा दोन्ही बाबतीत सेनेला दिर्घकालीन भूमिका ठरवणे भाग आहे. त्यात धरसोड घातक ठरू शकेल. आपण नव्याने राजकारण करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यापुर्वीच जाहिर केले आहे. ते नवे राजकारण स्वयंभूपणे उभे रहाण्याचे असू शकते. दुसरा कुठलाही पर्याय आता शिवसेनेसमोर शिल्लक उरलेला नाही. म्हणूनच युती राखायला गेल्यासही सेनेची विश्वासार्हता कमी होऊ शकते. जेव्हा राजकारणात अस्थिरता असते, तेव्हा तडजोडी शक्य असतात. पण त्या निकालानंतर निर्माण होणार्‍या परिस्थितीशी संबंधित असतात. युतीत सडलो म्हणणार्‍या पक्षप्रमुखाला, यापुढे निवडणूकपुर्व युतीसाठी मार्ग शिल्लक राहिलेला नाही. सहाजिकच नव्याने सुरूवात म्हणजे स्वबळावर राज्यव्यापी पक्ष होण्याखेरीज दुसरा मार्ग राहिलेला नाही. आज मुंबई जिंकलेली असो वा त्यात अपयश आलेले असो, आपल्या पक्षाला स्वयंभू बनवण्याचाच मार्ग उद्धवना चोखाळणे भाग आहे. युती मोडताना वा नंतर प्रचारात घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने तीच दिशा दाखवलेली आहे. तोच मार्ग सोडला तर ती मतदाराची दिशाभूल मानली जाऊ शकते.

मुंबईसह अन्य नऊ महापालिका व २५ जिल्ह्यात निवडणूका आहेत. त्यात आपले अव्वल स्थान राष्ट्रवादी व कॉग्रेस यांना टिकवायचे आहे. त्यात त्यांना यश आले तर ती नव्याने पक्षाच्या उभारणीची सुरूवात ठरू शकेल. कारण त्याच आधारावर मग २०१९ विधानसभा व लोकसभेची तयारी त्या पक्षांना करता येईल. त्यात भाजपा वा शिवसेना बाजी मारून गेली, तर उध्वस्त पक्षाची डागडुजी कशी व किती करायची, त्याचीही चिंता आहेच. म्हणूनच या निकालावर त्यांनाही दोन्ही बाजूने विचार करण्याची गरज आहे. युतीने सत्ता मिळवली वा विधानसभेत पराभव केला, तरी ग्रामिण राजकारणाच्या बहुतेक संस्था राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या कब्जात आहेत. त्या तशाच राखणे शक्य नसले, तरी मोठ्या प्रमाणात तिथला आपला पाया शाबुत राखण्याचा प्रयास त्यांनी केला असणारच. पण या दोन्ही प्रस्थापित पक्षांचा पाया तसाच टिकून राहिला, तर आगामी राजकारणात ते आक्रमक पवित्रा घेऊ शकतात. भविष्यातील राजकारणासाठी पुन्हा एकत्र येऊन आघाडी करू शकतात. म्हणजेच कितीकाळ एकट्याने लढून भाजपा वा शिवसेनेला शिरजोर होऊ द्यायचे; याचा त्याही दोन पक्षांना गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. सहाजिकच अजून मतदान झालेले नसले व त्याचे निकाल हाती आलेले नसले, तरी ही मिनी विधानसभा निवडणूक भावी राजकारणाला दिशा देणारी आहे. म्हणूनच तिच्या परिणामांचा विचार सर्वांना आधीपासून करणे भाग आहे. त्यातून येणारे निकाल मनासारखे असले तर काय करायचे आणि अपेक्षाभंग करणारे ठरले, तर काय पवित्रा घ्यायचा, त्याचे दोन्ही पवित्रे चारही प्रमुख पक्षाना आतापासून ठरवणे भाग आहे. म्हणूनच प्रचाराची रणधुमाळी संपलेली असली, तरी आताच खर्‍या धुर्त राजकारण्यांना डावपेचांचे वेध लागलेले असतील. मनातली धाकधुक वाढलेली असेल. गुरूवारच्या पोटात काय लपलेले आहे, त्याची चिंता सतावत असेल.