Private Advt

नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या घरी चोरी

नाशिक – महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही चोरी नाशकातील नाही तर ठाण्यातील घरी झाली आहे. चोरट्यांनी घरातील १ लाख ६२ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याचेही स्पष्ट झाले आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त कैलास जाधव यांच्या मुलाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. जाधव यांचा ठाण्यातील वसंत विहार येथे घर बंगला आहे. या बंगल्यामध्ये पत्नी आणि मुलगा हे वास्तव्यास असतात. गेल्या शुक्रवारी हे दोघेजण नाशिकला आले होते. त्याचवेळी घरी कुणीही नव्हते. त्यामुळे चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच, १ लाख ६२ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. बंगल्यातील नोकरदाराला हा प्रकार दुसऱ्या दिवशी समजला. त्यानंतर त्याने जाधव कुटुंबियांना ही बाब सांगितली. तक्रारीनुसार, चितळसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.