Private Advt

नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला अपघात : सीआरएस चौकशीत 15 जणांचे जवाब नोंदवले

भुसावळ : नाशिकजवळच्या लहावीत रेल्वे स्थानकाजवळ रविवारी दुपारी 3.10 वाजता डाऊन पवन एक्सप्रेसला अपघात होवून 11 डबे रूळावरून घसरले होते. या अपघाताची सीआरएस चौकशी होत असून बुधवारी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सीआरएस मनोज अरोरा यांनी 15 जणांचे जवाब यावेळी नोंदवले. दरम्यान, रेल्वे रूळाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्यान हा अपघात घडल्याचा कयास वर्तवला होता मात्र आता या चौकशीत नेमक काय तथ्य समोर येते? याकडे लक्ष लागले आहे.

सेप्टी आयुक्तांकडून चौकशीला सुरूवात
रविवारी पवन एक्स्प्रेसला नाशिकजवळच्या लहावीत रेल्वे स्थानकावर अपघात झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यांचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले होते. या अनुषंगाने बुधवारी रेल्वे सेफ्टी आयुक्त मनोज अरोरा यांनी नाशिकरोड वरील स्टेशन व्यवस्थापक यांच्या दालनात 15 जणांचे जवाब नोंदवले. प्रसंगी मुख्य ट्रॅक अभियंता विनीतकुमार गुप्ता, डीआरएम एस.एस. केडीया, एडीआरएम यांच्यासह विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी चौकशीच्या ठिकाणी उपस्थित होते. सकाळी दहा वाजता चौकशीला सुरूवात झाली. यावेळी अपघाताची संपूर्ण माहिती जाणून घेत, कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविण्यात आले. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, स्टेशन मास्तर यांची चौकशी झाल्याचे सांगण्यात आले.

यांचे नोंदवले जवाब
सीआरएस चौकशीत बुधवारी पवन एक्स्प्रेस गाडीचे लोको पायलट, या गाडीच्या अगोदर गेलेल्या गाडीचे लोको पायलट, गार्ड, तिकीट तपासणीस, कंट्रोलर, गेटमन, ट्रॅकमन, अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी आदी 15 जणांचे जबाब नोंदविण्यात आले. ही चौकशी सायंकाळी सातनंतरही सुरू होती.