यावल : तालुक्यातील कासारखेडा येथील 39 वर्षीय शेतकर्याने नापिकीला कंटाळून विष प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. समाधान उर्फ छोटू रतन पाटील (39) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
नापिकीला कंटाळून आत्महत्या
कासारखेडा येथील शेतकरी समाधान उर्फ छोटू रतन पाटील ( 39) यांनी आपल्या शेतात कपाशीची लागवड केली मात्र कापसाचे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. यानंतर त्यांनी नुकतीच कांदा लागवड केली होती मात्र कांदा पिकाचेदेखील नुकसान झाले. या नापिकीला शेतकरी पाटील कंटाळले होते. गुरुवारी दुपारी शेतात गेल्यावर त्यांनी विषारी द्रव प्राषण केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. मृत पाटील हे कुटुंबातील कर्ती व्यक्ती होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे.