नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली

0

जामनेर: भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व त्यांची कन्या जिल्हा बँकेच्याअध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली असून जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली असल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी आज केला. खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पाटील पुढे म्हणाले की, पक्षासाठी जिल्ह्यामध्ये चांगले वातावरण असून नागरी समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काम करीत आले आहे. जामनेर तालुका हा 100 टक्के राष्ट्रवादी व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे आणि मग येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कोणात किती दम आहे ते पाहून घेऊ असा इशाराही त्यांनी दिला. माजी जि.प.सदस्य संजय गरुड यांनी सांगितले की, तालुक्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असून काही दिवसातच मोठा कार्यक्रम घेऊन या सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाईल. येत्या 25 वर्षापर्यंत राष्ट्रवादी महा विकास आघाडीचे सरकार राहणार असून कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये म्हणून भाजपवाले सरकार पडणार असल्याची भीती दाखवत आहे असे ते म्हणाले. महिला प्रदेश सचिव वंदना चौधरी, सेलच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. ऐश्वर्या राठोड यांनी आपल्या भाषणातून पक्षाने महिलांना न्याय देण्याचे काम केले असून महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती दिली. यावेळी प्रफुल्ल लोढा, उमेश नेमाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनीही आपले विचार मांडले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रमाची रूपरेषा यावेळी आखण्यात आली .रक्तदान शिबिर, महाराजस्व अभियान 13 ते 23 डिसेंबर दरम्यान राबवले जाणार आहे.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड, उमेश नेमाडे, महिला प्रदेश सचिव वंदना चौधरी, डॉ. ऐश्वर्या राठोड, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, अ‍ॅड. ज्ञानेश्वर बोरसे, अरविंद चितोडिया, अनिल प्रशांत बोहरा, पप्पू पाटील, माधव चव्हाण, योगेश देसले, डॉ. प्रशांत पाटील अशोक चौधरी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले तर शहराध्यक्ष पप्पू पाटील यांनी आभार मानले.

Copy