नाथाभाऊंनी त्यांच मत मांडलं, भाजपाचं काम जनतेसाठीच

खडसेंच्या आरोपाला खडसेंकडून उत्तर

जळगाव – केंद्रासंदर्भात ते नाथाभाऊंचं मत आहे ते त्यांनी मांडलं आहे. कोरोना रोखण्यासंदर्भात प्रत्येक पक्ष आपापल्या परिने काम करीत आहे. भारतीय जनता पार्टीचे काम हे जनतेसाठीच आहे. शासनासोबत आमची जी अनबन होतेय ती जनतेसाठीच होत आहे आमच्या स्वार्थासाठी नाही अशा शब्दात आज भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे.
राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र शासनाकडुन दुजाभाव केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्ष कार्यालयात झालेल्या रक्तदानाच्या कार्यक्रम प्रसंगी केला होता. दरम्यान आज भारतीय जनता पार्टीतर्फे कोरोनाच्या परिस्थीतीबाबत भाजपाचे दोन्ही खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना खासदार रक्षा खडसे यांनी केंद्र शासनाची बाजु लावून धरली. खा. रक्षा खडसे यांनी सांगितले की, कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकारने कधीही दुजाभाव केला नाही. राज्य सरकाला हवी तेवढी मदत केंद्र सरकारने केली आहे. राज्यात ऑक्सीजनची कमतरता होती. मात्र आता केंद्र शासनाच्याच माध्यमातून रेल्वेद्वारे ऑक्सीजनची व्यवस्था झालेली आहे. केंद्राला दुजाभाव करायचा असता तर एवढ्या मोठ्या व्यवस्था केंद्राने उभ्या केल्या नसत्या. कोरोना रोखण्याचे श्रेय कुणालाही घ्यायचे नाहीये. राज्य सरकारही आपापल्या परिने काम करीत आहे. आपल्या राज्य सरकारने २५ वर्षावरच्यांना लसीकरण करण्याची मागणी केंद्राकडे केली होती. केंद्र सरकारने १८ वर्षाच्या वरील सगळ्यांना १ मे पासून लसीकरणाला परवानगी दिली आहे. केंद्र सरकार कोणतेही राजकारण करीत नाही असेही खा. रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.