नाणारवरून आमदार नितेश राणे आक्रमक; एकदाचा प्रकल्प रद्द करा

0

मुंबई- नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवाशांनी आझाद मैदानात पुन्हा एल्गार पुकारला असतानाच विधिमंडळातही याचे पडसाद उमटले. नाणार प्रकल्पग्रस्तांवर सरकारची दडपशाही सुरु असून ही नाटके थांबवून सरकारने एकदाचा हा प्रकल्पच रद्द करुन टाकावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. नाणार प्रकल्पावरून आमदार नितेश राणे विधान सभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आमदार राणे यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

नाणार प्रकल्पाविरोधात गेल्या वर्षीपासून स्थानिकांनी सुरु केलेला संघर्ष तीव्र झाला असून आझाद मैदानात प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरु केले आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांना भेट न दिल्याने आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. हा मुद्दा बुधवारी विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार नितेश राणेंनी हा मुद्दा उपस्थित केला.

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी महिला आंदोलकांना ताब्यात घेतले होते, असा आरोप त्यांनी केला. ही दडपशाही थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. ९५ टक्के लोकांनी हा प्रकल्प नको असे सांगितले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करणार, असे वेळोवेळी सांगितले. नाणार प्रकल्प रद्द नाही झाला तर राजीनामा देऊ असेही ते म्हणाले होते. पण आम्हाला राजीनामा नको, हा प्रकल्प रद्द होणार का हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी नितेश राणेंनी सभागृहात केली.