नाडगाव ग्रामसेवकांच्या निलंबनामुळे उडाली खळबळ

नाडगाव येथे चौदाव्या वित्त आयोगासह दलित वस्ती सुधारणा योजनेत अपहाराच्या तक्रारी भोवल्याने कारवाई

बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथे चौदाव्या वित्त आयोगासह दलित वस्ती सुधारणा योजनेत अपहार झाल्याच्या तक्रारीनंतर ग्रामसेवक विजय बाविसाने यांना 22 रोजी निलंबित करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी संतोष नागतिळक म्हणाले. संबंधित ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशीदरम्यान सिद्ध झाल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अपहार भोवल्याने निलंबन
सुरूवातील तत्कालीन गटविकास अधिकारी वाघ यांच्याकडे तक्रार करण्यात आली व यानंतर मावळे यांनी चौकशी केली मात्र निवडणूक कार्यक्रम लागल्याने प्रकरण प्रलंबित होते. त्यानंतर नूतन गटविकास अधिकारी संतोष नागतिळक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या तक्रारींची चौकशी केली. चौकशीत प्रशासकीय अनियमितता, कर्तव्यात कसूर व प्रथम दर्शनी अपहार झाल्याचे दिसून आल्याने ग्रामसेवक विजय बाविसाने यांना 22 रोजी निलंबित करण्यात आले. दरम्यान, चौकशी सुरू असल्याने नेमका किती रुपयांचा अपहार झाला आहे हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.

यांनी केल्या होत्या तक्रारी
चौदाव्या वित्त आयोगासह दलित वस्ती सुधारणा निधीतील कामे कागदोपत्री झाल्याने निधी परस्पर लाटला गेल्याच्या तक्रारी सुभाष इंगळे, अनिल गुर्चळ, सोपान इंगळे व युवा सेना तालुका समन्वयक अमोल व्यवहारे यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ग्रामसेवक विजय बाविसाने यांच्याकडून तो दंडात्मक स्वरुपात वसुल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.