नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला

0

पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला असून, तो उद्यानामागील मुठा पात्रामध्ये टाकून देण्यात आला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, डेक्कन पोलिसांनी चार तरुणांना संध्याकाळी अटक केली. या कृत्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने स्वीकारली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत, तर मूळ जागी पुन्हा गडकरींचा पुतळा उभारण्यात येईल, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, साहित्य व रंगभूमीच्या वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेचे उद्यान अधीक्षक दिगंबर घोरपडे यांनी टेक्कन पोलिसांत या घटनेची पिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला होता. हर्षवर्धन मगदूम (वय 23, रा. बालाजीनगर), प्रदीप कणसे (वय 25, रा. नर्‍हे आंबेगाव), स्वप्निल काळे (वय 24, रा. चर्‍होेली), व गणेश कारले (वय 28, रा. चांदूस, ता. खेड) या चौघांना संध्याकाळी पोलिसांनी अटक केली.

55 वर्षे जुना पुतळा

राम गणेश गडकरी यांच्या 43 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संभाजी उद्यानात 23 जानेवारी 1962 रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते गडकरींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. तत्कालीन स्थानिक नगरसेवक सदाशिव बाळकृष्ण कुलकर्णी आणि आणि महापौर शिवाजी अमृतराव ढेरे यांच्या पुढाकाराने संभाजी उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला होता. ब्रॉन्झचा हा अर्धाकृती पुतळा ए. व्ही. केळकर यांनी घडवला होता. यावर्षी पुतळ्याला 55 वर्षे पूर्ण होत होती. पुतळ्याच्या चौथर्‍यावर गडकरींच्या एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव, प्रेम संन्यास आणि राज संन्यास या नाटकांची नावे कोरलेला ताम्रपट असून, कोनशिलाही आहे. उद्यनात कारंज्याच्या मध्यभागी हा चौथरा असून, या भागात सध्या उद्यान विभागाकडून दुरुस्ती आणि सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत.

पहाटे शिरले तरूण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साधारणपणे दोनच्या सुमारास चार तरुण उद्यानात घुसले. ते नेमके कोणत्या बाजूने आले याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु, त्यांनी पुतळा हलवून बाजूला केला. हा पुतळा उचलून उद्यानाच्या पाठीमागूनच वाहत असलेल्या मुठा नदीपात्रामध्ये नेऊन टाकला. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणार्‍या गडकरींचा पुतळा फोडला असून हा पुतळा गटारगंगेत टाकून दिल्याचा मेसेज या तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. या मेसेजमध्ये हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे, गणेश कारले या तरुणांची नावे होती. आपण स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले होते. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या कृत्याचे समर्थन करीत महापालिकेकडे गडकरींचा पुतळा हलवण्याबाबत गेल्या आठ वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आम्ही पुतळा हलवल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी राज संन्यास या नाटकात संभाजी महाराजांना बदफैली, व्यसनी असे संबोधल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते आणि आमदार नीतेश राणे यांनी या घटनेचे समर्थन केले.

पुतळा पुन्हा उभारणार
संभाजी उद्यानातून हटवण्यात आलेला राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा उभारु, अशी घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली. समाजात तेढ निर्माण करणार्‍यांवर कठोर पोलीस कारवाई व्हावी. मतांचे राजकारण करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे महापौर म्हणाले. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही या घटनेचा निषेध केला. राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणे निंदनीय असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. राम गणेश गडकरी यांचे योगदान मोठे आहे. अशा पद्धतीने पुतळ्याची नासधूस करणे राज्याच्या संस्कृतीला साजेसी नाही, अशा शब्दांत शिवसंग्रामचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी या घटनेचा निषेध केला.