नागेश्‍वर मंदिर मार्ग पुलाच्या कामावरून श्रेयवादाचा कलगीतुरा

आमदारांच्या काळातील काम : प्रवीण चौधरी ; माजी मंत्री खडसेंनी केला पूल मंजूर : अ‍ॅड.रोहिणी खडसे

मुक्ताईनगर : जुनेगाव नागेश्वर मंदिर मार्ग ते तीर्थक्षेत्र श्री संत मुक्ताई मंदिराकडे जाणार्‍या पूल काम मंजुरीवरून तालुक्यात श्रेयवादाचा रंगलेला कलगीतुरा चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पुल कामाचे 4 रोजी भूमिपूजन झाल्यानंतर दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. जिल्हा बँक जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पाठपुरावा करून पूल मंजूर करून निधी आणल्याचा दावा केला आहे तर दुसरीकडे आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना जुनी कोथळी, निंबादेवी मंदिराजवळील लहान पुलाची पुर्नबांधणी करणे हे काम 2020-21 च्या अर्थसंकल्पातील मंजूर काम असून आमदार पाटील यांनी ते मंजूर केल्याचे सांगितले आहे.

आमदारांच्या हस्ते उद्घाटन
दरम्या, शेकडो वर्षांपासून चा वारकर्‍यांचा मुख्य मार्ग असलेल्या जीर्ण झालेल्या पुलाची जुने गावातील रहिवासी तसेच वारकर्‍यांची मागणी होती. या मागणीच्या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा पूल मंजूर करीत निधी आणला. 4 मे 2021 रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांचे हस्ते भूमिपूजन अगदी साध्या पद्धतीने पार पडले.

यांची कार्यक्रमास पस्थिती
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोक नाईक, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, काँग्रेस युवक शहराध्यक्ष पवन खुरपडे, नीरज बोरखेडे, शिवसेना शहरप्रमुख गणेश टोंगे, गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता एल.सी.सावखेडकर, शेजोळे तसेच ग्रा.पं.चे माजी सदस्य दीपक नाईक, दीपक कोळी, संतोष माळी, राजेंद्र तळेले, विठ्ठल तळेले, हारूण शेख, पप्पू मराठे, आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.

अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाले, हे तर श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न
पूल कामाच्या उद्घाटनानंतर जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी पत्रकार परीषदेत नागेश्वर मंदिर जुनेगाव ते मुक्ताई मंदिर या मार्गावर सुरू असलेल्या पुलाचे बांधकाम हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याचे सांगत दुसर्‍यांच्या कामाचे श्रेय घेण्याचे केविलवाणे प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. 2019 मध्ये एकनाथराव खडसे यांनी नागेश्वर मंदिर ते मुक्ताई मंदिर मार्गावरील पुलासाठी निधीची मागणी केली होती, असे सांगत त्या म्हणाल्या,
नाबार्ड अंतर्गत त्या पुलाच्या बांधकामाला सुमारे दीड कोटी रुपये निधी मंजूर झाला होता व आता काम सुरू झाले आहे. मेळसांगवे ते ऐनपूर मार्गावरील तापी नदीवरील पुल होणे बाकी असून धमक असेल तर त्या पुलासाठी निधी आणून पूर्णत्वास नेऊन दाखवावा व तसे केले तर मी स्वतः त्यांचा सत्कार करेल, असे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांना अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी आव्हान दिले आहे.