नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी; तिसरा, चौथा टप्पा परवडणारा नाही!

0

‘आयएमए’ जळगाव शाखेचे सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील यांचे आवाहन

अमित महाबळ

जळगाव: कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. परंतु, महाराष्ट्रातील दुसर्‍या टप्प्यातील कोरोेनाची लागण जर तिसर्‍या, चौथ्या टप्प्यात गेली तर कल्पनाही करवत नाही, अशी भयानक स्थिती उद्भवेल. त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, असा स्पष्ट इशारा ‘आयएमए’च्या जळगाव शाखेचे सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी दिला आहे. हे सर्व टाळण्यासाठी लोकांनी स्वयंशिस्तीने काही बंधने स्वतःवर घालून घ्यावीत आणि त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात दुसर्‍या टप्प्यातील कोरोना असून, पुढील 15 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. राज्यात पूर्णपणे शटडाऊन टाळायचे असेल तर लोकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘जनशक्ति’ने डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्याशी संवाद साधला.

कोरोनाच्या तिसर्‍या व चौथ्या टप्प्याविषयी सरकारला एवढी धास्ती का आहे?

मुख्यमंत्री जे आवाहन करत आहेत ते गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे एकूण चार टप्पे (स्टेज) आहेत. पहिल्या टप्प्यात व्यक्ती बाधित होते, दुसर्‍या टप्प्यात त्याच्या कुटुंबातील सदस्यांना या विषाणूची लागण होते. तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात मात्र, समाजामध्ये ‘मल्टीपल’ पद्धतीने कोरोनाची लागण व्हायला सुरुवात होते. अशावेळी रुग्ण प्रचंड संख्येने वाढतात. त्यांच्या तुलनेत डॉक्टर, नर्स व वैद्यकीय कर्मचार्‍यांची संख्या कमी पडू लागते. एकूणच स्थितीवर नियंत्रण मिळविणे अतिशय कठीण होते किंबहुना परिस्थिती हाताबाहेर जाते. हीच स्थिती आता इटलीमध्ये बघायला मिळत आहे.

शेवटच्या दोन टप्प्यांचे स्वरुप कसे असू शकते?

शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये समोरासमोर बसून बोलणे, चर्चा करणेही शक्य नसते. रुग्ण तपासणारे डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय हे देखील बाधित होण्याची भीती असते. त्याचा थेट परिणाम वैद्यकीय सेवेवर होतो. सध्या अनेक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आपले संपूर्ण शरीर विशिष्ठ प्रकारच्या वेशभूषेने झाकून घेत असल्याचे दिसते. तीच वेशभूषा तिसर्‍या व चौथ्या टप्प्यात घराबाहेर निघतांना लोकांना करावी लागेल.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी डॉक्टरांनी काय काळजी घ्यावी?

डॉक्टरांनी सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा. रुग्णांपासून विशिष्ठ अंतर राखावे. दवाखान्यात कमीत कमी गर्दी असावी. याची खबरदारी रुग्णाच्या नातेवाइकांनीदेखील घ्यावी, सर्दी व खोकला असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कोरोनाची बाधा होण्याचा धोका कोणाला अधिक असतो? अशा व्यक्तींनी काय करावे?

मधुमेह, रक्तदाब, एचआयव्ही, हृदयविकार, न्यूमोनियाचे रुग्ण, तसेच गर्भवती महिला व वयोवृद्ध व्यक्ती यांनी घराबाहेर निघणे शक्यतो टाळावे. कारण, त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. लहान मुलांचीही विशेष काळजी पालकांनी घ्यावी.

कडक तापमानात कोरोनाचा विषाणू जिवंत राहात नाही या माहितीत तथ्थ्य आहे का?

आपल्याकडे (खान्देशात) उष्माघाताने नागरिक दगावतात. अशा या कडक तापमानात कोरोनाचा विषाणू टिकणार नाही हे खरे आहे पण बाहेरचे आणि घरातील तापमान यामध्ये बरीच तफावत असते. एसी, कुलरमुळे घरातील तापमान कमी असते आणि कमी तापमान विषाणूसाठी पोषक ठरते.

विदेशातून वा बाहेरगावहून आलेल्यांचे कपडे उन्हात वाळवायला हवेत का?

विदेशातून वा बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींचे कपडे प्रथम गच्चीवरील उन्हात वाळवावेत, त्यानंतर ते साबणाने स्वच्छ धुवून काढावेत. विदेशातून कोणी आले असेल तर त्याची माहिती प्रथम स्थानिक प्रशासनाला कळवावी. अशी माहिती लपविणे हा गुन्हा ठरणार आहे. प्रशासनाला सहकार्य केल्यास हा विषाणू आटोक्यात येईल.

विदेशातून आलेल्या रुग्णांना 14 दिवस वेगळे का ठेवले जाते? या आजारातून रुग्ण बरे होतात का?

विलगीकरण प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. 14 दिवसांत संशयित रुग्णात कोणती लक्षणे दिसून येतात त्यानुसार त्याच्यावरील पुढील उपचारांची दिशा डॉक्टरांना निश्‍चित करता येते. उपचारांमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. या आजारातून बरे होण्यास इच्छाशक्ती (व्हीलपॉवर) तेवढीच महत्त्वाची आहे.


कोरोनाबाधेची लक्षणे काय आहेत? रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय करता येईल?

कोरडा खोकला, सांधेदुखी, श्‍वास घेण्यास त्रास, डोळे येणे ही कोरोनाबाधेची लक्षणे आहेत. डोळ्यातील अश्रूंद्वारेही कोरोनाची बाधा इतरांना होऊ शकते. संतुलित आहार घेण्यासह आहारात लिंबू व संत्री यांचा वापर वाढवावा. यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

कोरोना आजारावर लस अथवा औषधे उपलब्ध आहेत का?

कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी भारतात प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूला शरीरापासून वेगळे करण्यात एनआयव्हीतील शास्त्रज्ञांना यश आले आहे. हा पहिला टप्पा आहे. यानंतर ही लस ‘गिनिपिग’वर वापरून पाहिली जाईल. त्यातून सुपरिणाम-दुष्परिणाम समोर येतील त्याआधारे बदल करून लस तयार केली जाईल. परंतु, ही लस प्रत्यक्ष वापरात येण्यास अद्याप एक ते दीड वर्ष लागू शकते.