Private Advt

नागपूरातील तरुणीवर बलात्कार : जळगावातील तरुणाला अटक

जळगाव : इन्स्टाग्रामवरुन निर्माण झालेल्या ओळखीनंतर बहरलेल्या प्रेमानंतर नागपूरातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने सतत सात महिने बलात्कार केला व नंतर लग्न करण्याचा शब्द फिरवत तरुणीची फसवणूक करीत तिला वार्‍यावर सोडले. तरुणीने या प्रकरणी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दानिश खान मुबारक खान (19, गेंदालाल मिल, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पीडीता नागपूर जिल्ह्यातील रहिवासी
पीडीत तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. 2021 मध्ये तिची इन्स्टाग्रामवर जळगावातील गेंदालाल मिल येथील दानिश मुलतानी सोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरू झाले. या दरम्यान तरुणीचे तिच्या समाजाच्या तरुणासोबत लग्न ठरले व त्याचवेळी दानिशने तरुणीला फोन करुन मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्याशी लग्न करेन, असे आश्वासन दिले तसेच लग्नाच्या आमिषाने वेळोवेळी नागपूरातील लॉज तसेच जळगावात तरुणीवर बलात्कार केला. 4 एप्रिल रोजी तरुणी जळगावात आली व तिने दानिशच्या कुटुंबियांची भेट घेतली. 7 एप्रिल पर्यंत ती जळगावात राहिली. त्यानंतर दानिशच्या मित्रांनी तिला एकटेच मलकापूरात सोडले. तरुणी कशीतरी नागपूरातील तिच्या मावशीकडे पोहोचली. यादरम्यान तरुणीने दानिशला फोन केले व घ्यायला यायला सांगितले. मात्र त्याने येण्यास नकार देत उलट तरुणीला जळगावात बोलाविले.

तरुणीची जळगावात बोलावून केली फसवणूक
तरुणी एकटीच जळगावात आली. या दरम्यान दानिशने त्याचा फोन बंद करुन ठेवला. फोन लागत नसल्याने तरुणी जळगावात नूतन मराठा महाविद्यालयाजवळ पोहोचली. दानिशसोबत संपर्क होत नसल्याने तरुणी हताश झाली व याच ठिकाणी रडत बसली. तिच्याकडे काही तरुणांचे लक्ष गेल्याने तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तरुणांनी तिला एका समाज सेविकेकडे नेले. समाजसेविकेच्या माध्यमातून तरुणीने फसवणूक झाल्याची तक्रार जळगाव शहर पोलिस ठाण्यात नोंदवल्यानंतर सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होवून काही तासातच तपासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने संशयीत दानिश यास गेंदालाल मिलमधून अटक केली.