नांदेड पोलिसांवर हल्ला करून धुळ्यातून पसार झालेले कुविख्यात दरोडेखोर जाळ्यात

लामकानीकरांची सतर्कता आली कामी ः धुळे तालुका पोलिसांनी केली दोघांना अटक

भुसावळ/धुळे : गुजरातसह महाराष्ट्र व पंजाब राज्यात धुमाकूळ घालून जबरी लुट करणार्‍या पंजाबातील दोघा दरोडेखोरांना नांदेड पोलिस वाहनातून नेत असताना संशयीतांनी पोलिसांवरच वाहनात हल्ला चढवून पळ काढल्याची घटना शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी धुळे शहराजवळील ईच्छापूर गणपतीजवळ घडली होती. या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीताच्या शोधासाठी पोलिसांनी सोशल मिडीयाद्वारे जनजागृती केल्यानंतर संशयीत लामकानीत धडकले मात्र सतर्क लामकानीकरांनी आरोपींना ताब्यात घेत सोनगीर पोलिसांना माहिती कळवली. पोलिस प्रशासनाने वेळीच धाव घेत दोघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. नवप्रीतसिंग तर्से सुमसिंग मनदीपसिंग जाट (ओबेरपूरा, पोस्ट जस्तरवाल, ता.अजनेला, जि.अमृतसर, पंजाब) व मोहित उर्फ मनी विजय शर्मा (रा.663, गल्ली क्रमांक तीन, बाटलारोड, प्रीतनगर, अमृतसर, पंजाब) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

आरोपींच्या हल्ल्यात पोलिस झाले होते रक्तबंबाळ
नांदेडहून चोरी केलेल्या दुचाकीसह संशयीत तारेशसिंग व मोहिम यांना गुजरातमधील व्यारा पोलिसांनी पकडले होते. नांदेड पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर नांदेड पोलिस दलातील उपनिरीक्षक एकनाथ देवके, कर्मचारी रत्नसागर कदम, नाथराव मुंढे, पोलिस चालक साईनाथ सोनसळे हे दोघा संशयीतांना न्यायालयाच्या परवानगीनंतर घेवून पोलिस व्हॅनमधून (एम.एच.26 आर.0667) ने घेवून निघाले असताना कुसुंबा शिवारातील इच्छापूर गणपतीजवळ संशयीतांनी पोलिसांवर हातातील हातकडीच्या सहाय्याने हल्ला चढवल्याने ते रक्तबंबाळ झाले तसेच आरोपींनी पोलिसांना चावा घेवून मारहाण करीत पळ काढला होता. या प्रकरणी पोलिस कर्मचारी एकनाथ देवके यांच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लामकानीकरांची सतर्कता : आरोपी अडकले जाळ्यात
संशयीत पोलिसांच्या पसार झाल्यानंतर पोलिसांनी सोशल मिडीयातून त्यांचे फोटो प्रसारीत केल्यानंतर लामकानी येथे संशयीत आढळल्यानंतर सुजाण नागरीकांनी व्हिडिओ काढून पोलिसांना पाठवला व आरोपी तेच असल्याची पुष्टी मिळताच मंगळवार, 28 रोजी नागरीकांनी त्यांना पकडून ठेवत सोनगीर पोलिसांना माहिती कळवली. सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील व पथकाने आरोपींना लामकानी गावातून अटक केली.

आरोपी कुविख्यात : तीन राज्यात गुन्हे
अटकेतील दरोडेखोर हे कुविख्यात असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्रासह गुजरात, पंजाब राज्यात गुन्हे दाखल आहेत शिवाय धुळे शहर, धुळे तालुका, विमानतळ पोलिस ठाणे, नांदेड तसेच व्यारा पोलिस ठाणे गुजरात व बदनापूर पोलिस ठाणे, जालना व राहता पोलिस ठाणे, अहमदनगर तसेच मनमाड शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा तसेच आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.