नांदगावात-मानमोडीत शेतकरी संघटनेचे मुठभर कापूस जाळा आंदोलन

2

बोदवड : राज्यभरात शुक्रवारी स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेद्वारा राज्य शासनाची कपाशी खरेदी बाबत उदासीनता, शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करण्याबाबत असलेल्या अटी-शर्तीमुळे शेतकर्‍यांचे पांढरे सोने समजल्या जाणार्‍या कपाशीला भाव नाही तर पेरणी जवळ आली असून मुख्यमंत्री, पणन मंत्री यांच्याशी बोलुनदेखील तोडगा निघत नसल्याने राज्यभर कपाशी जाळा आंदोलन करण्यात आले. नांदगाव-मानमोडीत अशाच पद्धत्तीने आंदोलन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
नांदगाव येथे झालेल्या आंदोलनात प्रवीण मोरे, संतोष पाटील, बहादुर सिंह पाटील, पांडुरंग पाटील, मोहन पाटील, अरुण पाटील यांच्या उपस्थितीत राज्या सरकारचा निषेध म्हणून मुठभर कापूस जाळा आंदोलन करण्यात आले तर मानमोडी येथे मधुकर पाटील, दगडु शेळके, अक्षयस पाटील, रवी पवार, सीताराम कोळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.

या मागण्यांसाठी झाले आंदोलन
शेतकर्‍यांचा सरसकट फरदळीसह कापुस खरेदी करावा, एफयु तीन्ही ग्रेडचा कापुस खरेदी करण्यात यावा, सर्व खरेदी केंद्र सुरू करावीत व ते शक्य न झाल्यास भावातर योजना करण्यात यावी, सर्व जिनिंगवर कापुस खरेदी खरेदी करणे शक्य नसल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा उपयोग करून जिनींग ताब्यात घ्याव्यात तसेच कोरोनाचा फटका शेतकरी वर्गाला बसल्याने शेतकर्‍यांना हमी भावाप्रमाणे विकलेल्या शेतमालावर अनुदान द्यावे, आदी मागणी करण्यात आल्या.

Copy