नशिराबादनजीक दुधाचा टँकर उलटला ; दुधासाठी पडल्या उड्या

0

भुसावळ- भुसावळकडून जळगावकडे निघालेला दुधाचा टँकर नशिराबादजवळील भाऊच्या ढाब्याजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात उलटल्याने हजारो लीटर दुध जमिनीवर सांडले तर टँकरमधील दुध मिळण्यासाठी महामार्गावरील वाहनधारकांनी मिळेल त्या साधनांनी प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. झाले असे की, नागपूरकडे मुंबईकडे दुध घेवून निघालेला टँकर (पी.बी.02-सीसी 7013) हा भरधाव वेगाने भुसावळकडून जळगावमार्गे मुंबई जात असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात भाऊच्या ढाब्याजवळ उलटला. रस्त्याच्या कडेलाच हा टँकर उलटल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती तर सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नशिराबाद पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच शांताराम तळेले व रवी इंधाटे यांनी कर्मचार्‍यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, टँकरमधून दुध जमिनीवर सांडत असल्याची पाहून अनेक वाहनधारकांनी बाटल्या, कॅन तसेच अन्य मिळेल त्या साधनांनी दुध मिळवण्याचा प्रयत्न केला. या अपघातात सुदैवानेही कुणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले तर टँकर चालकाने मात्र या प्रकाराबाबत काहीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितल्याने याबाबत नशिराबाद पोलिसात नोंद झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पंजाबमधील फरीदकोट येथील सतनाम सिंह यांच्या नावावर हा टँकर रजिस्टर्ड असल्याचे समजते.

Copy