नव वसाहतीत मुलभूत सुविधांची होतेय ओरड

0

भुसावळ । तालुक्यात शहरातील श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी परिसर व रेल दुनिया परिसरात विविध समस्या कायम असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील गटरींच्या स्वच्छतेसाठी पालिकेतर्फे उपाययोजना करण्यात येत नाही. गटरमध्ये रेती भरलेली असून यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असतो. तसेच कचरा हा मोक्याच्या जागेवर पडलेला आहे. या सर्व ठिकाणाहून कायम मोठ्या प्रमाणावर रहदारी होत असते. आधीच दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात अस्वच्छता संपूर्ण भागामध्ये पसरलेली आहे. त्यामुळे मलेरिया, काविळ, डेंग्यु, अतिसार आदी साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. तरी पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या भागांमध्ये त्वरित स्वच्छता मोहिम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी जुन्यांच्या वाटेवर न जाता शहरातील प्रत्येक भागात विकास कामे करण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

डेंग्युमुळे झाला होता विद्यार्थ्यांचा मृत्यू

येथील समस्या सोडविण्याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेतील अधिकारी व आरोग्य विभागाकडे वारंवार अर्जांच्या माध्यमातून गार्‍हाणी मांडली. मात्र अधिकार्‍यांनी त्यालाही केराची टोपली दाखवली आहे. जळगाव रोड परिसर अनेक समस्यांनी बाधित झाला असून, हिवताप, डेंग्यु सारखे तत्सम आजार या भागातील नागरिकांना उद्भवू शकण्याची शक्यता टाळता येत नाही. खळवाडी परिसरातील एका विद्यार्थ्याचा डेंगूमूळे मृत्युसुद्धा झालेला आहे. या भागात पालिकेतर्फे नियमितपणे साफ-सफाई करण्यात येत नसते. ज्यामुळे, सदर घाणीचे साम्राज्य आहे. वर्षानुवर्षे पालिकेतर्फे औषध फवारणी केली गेलेली नाही. जळगाव रोड विभागातील संपूर्ण रेल दुनीया परिसर, संपूर्ण अष्टविनायक कॉलनी व श्रीनगर मधील काही भागातील रहिवासी दररोज 24 तास वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात आहेत. मुलभुत सोयी सुविधांचा अभाव आहे. परिसरामधील श्रीनगर, रेल दुनीया परिसर, अष्टविनायक कॉलनी, हुडको कॉलनी परिसरात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही, वार्डातील गटारांची दैनंदिन सफाई होत नाही त्यामुळे परिसरातील सांडपाणी वाहून जाण्यास अडचणी निर्माण होत असून या भागातील रहिवाश्यांची पाण्याची समस्या, वार्डातील पिण्याच्या पाणीवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती, जुना सातारा व भोई नगर परीसरातील पालिकेच्या सार्वजनिक शौचालयात नियमित स्वच्छता व्हावी, रस्त्यावरील बंद पथदिवे बंद असून अश्या समस्या असून सोडविण्याची आवश्यकता आहे.

कराचा भरणा करुनही सुविधा मिळेना

हा परिसर पालिका हद्दीत येत असून याठिकाणी रहिवास करणारे नागरिक नियमितपणे पालिका प्रशासनास कराचा भरणा करीत असतात. मात्र त्यामानाने कुठल्याही सोयी सुविधा नागरिकांना दिल्या जात नाही. त्यामुळे याअगोदरच्या सत्ताधार्‍यांच्या पावलावर पाऊल न टाकता पालिकेतील नुतन सत्ताधार्‍यांनी तरी यात बदल करण्याची आवश्यकता आहे.

14 व्या वित्त आयोगातून रस्ते करावे

रावेर येथील रस्ते दयनीय अवस्थेमध्ये आहेत. या भागात डांबरीकरणाची नितांत आवश्यकता आहे. मागील 15 वर्षापासून या भागामध्ये रस्त्यांचे नुतनीकरण झालेले नाही. नागरिक विकासाची प्रतीक्षा करीत आहेत. लहान मुले शाळेत याच रस्त्यावरून जातात. महिला व जेष्ठ नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर हाच मार्ग वापरतात. त्यामुळे येथून ये- जा करणार्‍या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असते. या भागातील सर्व रस्त्यांचे 14 व्या वित्त आयोगातून डांबरीकरण तसेच गटारिचे नुतनीकरण व्हावे ही परिसरातील नागरिकांची मागणी आहे. तरी आपण या योग्यती कार्यवाही करावी व समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे.

परिसरामधील रस्त्यांची दयनिय स्थिती झालेली आहे. 14 व्या वित्त आयोगातून डांबरीकरण तसेच गटारिचे नुतनीकरण व्हावे तसेच इतर नागरी समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांच्याशी 9 सप्टेंबर पासून पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरु केलेला होता. काही योजना व प्रकल्प तांत्रिक बाबींमुळे रखडले आहेत, त्यातील त्रुटी व अडचणी दूर करू असे सांगण्यात आलेले होते. लवकरच नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याशी भेटही घेतली जाणार आहे. भुसावळ शहराचे स्मार्ट सिटी बनविण्याची भाषा करणार्‍यांनी जळगाव रोड परिसरातील समस्या प्रथम सोडवण्याकडे लक्ष द्यावे अशी आमची मागणी आहे.
– प्रा. धीरज पाटील, सामाजिक कार्यकर्ता