नविन वसाहतींमध्ये मुलभूत सोयी- सुविधांची वानवा

0

फैजपूर : शहरात गेल्या काही वर्षांपासून नवीन वस्तीमध्ये रहिवाशी मुलभूत सुविधांपासून वंचित राहत आहे. शहरातील विविध कॉलनीमध्ये रस्ते, गटार, पाईपलाईन, दिवाबत्ती नाही. पालिकेत कराचा भराणा वाढला असला तरी नागरिकांना पालिकेकडून सुविधा पुरविण्यात येत नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे साफसफाई होत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून डासांचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे रोगराई फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी औषध फवारणी करण्याची आवश्यकता असून फवारणी देखील होत नाही.

सांडपाणी आले रस्त्यावर
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून नविन वसाहतींमध्ये तहानगर, शिवकॉलनी, जनशक्ती कॉलनी, मिल्लत नगर, झोपडपट्टी या भागाच्या विकासाकडे लक्ष देऊन कार्य करावे. गेल्या पाच वर्षात मिल्लत नगर व ताहानगरामध्ये कळमोदा रोड लगत गटारी नाही, सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचत असून यातून परिसरात दुर्गंधी फैलावत असते. तसेच येथून नागरिकांना ये – जा करताना देखील त्रास सहन करावा लागतो. तसेच पालिका हद्दीचा प्रश्‍न देखील प्रलंबित असून यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

ताहनगर हा परिसर पालिका हद्दीलगत येत असून या भागात विकास कामे करताना अडथळे निर्माण होतात याठिकाणी पाणी पुरवठा, गटार, पथदिवे, मंगल कार्यालयाची मागणी आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीं पालिका हद्दवाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. – शेख साबीर, सामाजिक कार्यकर्ते.