नवापूर शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडल्याने संताप

0

-जड वाहने शहरात येत असल्याचा परिणाम; नगरपालिकेचे दुर्लक्ष

नवापूर : शहरातील मेनरोड, लाईट बाजार भागात रोजच ट्राफिकजाम होत असल्याने तासनतास वाहतूक ठप्प होत आहे. शहरातील मुख्य मार्ग म्हणुन मेनरोड लाईट बाजार हा भाग ओळखला जातो. शाळा, मंदिर, मशीद, मुख्य बाजारपेठ, गुजरातकडे जाणारा रस्ता असल्याने वाहने या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर जात असतात. त्यामुळे या भागात वारंवार वाहनाची गर्दी होते. हा रस्ता अरुंद तसेच या मार्गावर व्यापारी संकुल व दुकाने मोठ्या संख्येने असल्याने पार्किंगची सोय नाही, त्यामुळे सहाजिकच ट्राफिक जाम होत आहे. ट्राफिक जाम झाल्यास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. अशातच वाहनचालकांमध्ये तूतू-मैंमै होत असल्याच्या घटना रोज घडत आहेत.

ट्राफिकजाम होण्याचे मुख्य कारण म्हणजे जड वाहनांचा प्रवेश आहे. ट्रक, टेम्पो यासारखी जडवाहने येथे येत असल्याने वाहने पुढे जाण्यास अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत असते. कै. गोविदराव वसावे नगराध्यक्ष असतांना त्यांनी जड वाहनांना प्रवेश बंद करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती. या मार्गावर शहरात पार्किंग ची व्यवस्था, वाहन तळ जागोजागी तयार केले होते, दुतर्फा बाजूस बॅरीकेट लावून जडवाहनाना बंदी केली होती. त्यावेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली होती नवापूरकरांनी या निर्णयाचे त्यावेळी स्वागत केले होते.

वाहतूक समस्या वाढत असतांना नगर पालिकेने काही महिन्यापुर्वी पुन्हा मेनरोडवर दुतर्फा बाजुने लोखंडी बॅरीकेट्स लावून जड वाहनांना प्रवेश बंदी घातली होती, मात्र काही महिन्यांपुर्वी जड वाहनांनी बॅरीकेट्सला ठोस देऊन दोन तीन वेळा ते तोडून टाकले. त्यानंतर बॅरीकेट्स लावणे नगर पालिकेने बंद केले आहे. जिल्हाधिकारी यांनी देखील वाहतूक व्यवस्थेबदल नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे. मेन रोड, मुख्य बाजारपेठ, लिमडावाडी, लाईट बाजार, नारायणपूर रोड आदी भागातील वाहतूक व्यवस्था देखील गंभीर बनलेली आहे या भागात पुर्णता वाहतूकीचे तीन तेरा वाजले आहेत.