नवापूरला सिनेस्टाईल महिलेच्या हातातुन पर्स लांबविली

0

नवापूर: कोरोना आल्यापासून लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद होते. अशातच चोरही गायब होऊन चोऱ्याही बंद झाल्या होत्या. दोन महिने चोरीच झाली नसल्याचे दिसले. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर चोऱ्यांना सुरुवात झाली आहे. महिलेच्या हातून पर्स हिसकावुन सिनेस्टाईल 25 हजाराचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची घटना नवापूर शहरामध्ये घडली आहे. भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे, शहरातील करंजी ओवारा उर्फ नयाहोंडा भागातील नवीन भाजीपाला मार्केटमधील नवीनच बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलावरून जाणाऱ्या शैलाबाई रमेश मावची यांच्या हातातील पर्स घेऊन अज्ञात व्यक्तीने सिनेस्टाईलप्रमाणे पोबारा केला. पर्समध्ये २१ हजार ५० रुपये तसेच ४ हजार रुपयाचा मोबाईल असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज होता. महिलेने पर्स हातातून चोरट्याने नेताच आरडाओरड करण्यात सुरूवात केली. मात्र, गजबजलेल्या व ये-जा करणाऱ्यांच्या लक्षात हा काय प्रकार आहे हे लक्षात आले नाही. कोणीही चोरट्याचा पाठलाग केला नाही. महिला ओरडत रडकुंडीला आली होती.लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे महिलेने सांगितले. एवढ्या भर रहदारीच्या परिसरात चोरटा मोठ्या सफाईने तिथून पसार झाला. पोलिसांनी चोरट्याचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.नवीन भाजीपाला मार्केटमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. शैलाबाई मावची यांनी फिर्याद दिल्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार पवार करीत आहे.

Copy