नवापूरला सर्वात मोठे कोंबड्यांचे कलिंग ऑपरेशन सुरु

0

389 कर्मचार्‍यांसह 95 पशुधन विकास अधिकार्‍यांचा समावेश
नवापूर। शहरात बर्ड फ्लु घोषित झाल्यानंतर बुधवारी, 10 फेब्रुवारी रोजी चौथ्या दिवशी न्यू डायमंड पोल्ट्री, वासिम पोल्ट्री येथे पथकाने जाऊन तेथे कोंबड्यांना मारण्याचे काम सुरु आहे. तसेच नवापूर शहरात नगरपालिका आरोग्य विभागामार्फत शहरातील तीनटेंबा, लालबारी, काळंबा तसेच शहरात पाळीव कोंबड्या पकडून जमा करत आहे. नगरपालिकेचे मुख्यधिकारी महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण, अजय तांबोळी यांच्यासह कर्मचारी काम करीत आहे. सर्वात मोठे कलिंग ऑपरेशन नवापूर शहरातील पोल्ट्रीमध्ये सुरू आहे. आतापर्यंत नाशिक विभागातील जळगाव 16 एका पथकात एक पशुधन विकास अधिकारी, एक पशुधन पर्यवेक्षक, दोन परिचर असे असे सर्व मिळून 389 कर्मचारी कलिंग ऑपरेशनाचे काम करीत आहेत. त्यांच्यासोबत 95 पशुधन विकास अधिकार्‍यांचा समावेश आहे.

शहरातील बर्ड फ्लू मोहिमेत नाशिक मनपाची यंत्रणा व साधन सामग्री मागविण्यात आली आहे. यंत्रणा तालुक्यातील सर्व पोल्ट्रीतील पक्षांची विष्ठा काढण्यासाठी काम करत आहेत. कलिंग मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना पीपी किट घालुन 24 तास उभे राहून ते काम करत आहे. काम करत असताना काही कर्मचार्‍यांना उलटी झाल्याची समस्या जाणवत आहे. आमलीवाला पोल्ट्रीतील चार कर्मचार्‍यांना त्रास झाल्याने तात्काळ उपचार करण्यात आला. त्यासाठी सर्व पोल्ट्रीमध्ये आरोग्य पथकाचे डॉक्टर, नर्स अशी टीम काम करत आहे. त्यांच्याकडून तातडीने उपचार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

पोल्ट्रीमधील 34 हजाराहुन अधिक कोंबड्यांचा नैसर्गिक मृत्यू
आठ पोल्ट्रीमधील पक्षी शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. तालुक्यातील पोल्ट्रीमधील कलिंग ऑपरेशन झाले. त्यात अंडी मोजणी करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक पशुसंवर्धन कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. कोंबड्यांचे कलिंग करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. नाशिक विभागातून पशुसंवर्धन विभागाची जवळपास 91 पथके दाखल झाली आहे. चार दिवसानंतर पाचव्या दिवशी पक्षी नष्ट करण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता. तालुक्यातील 4 कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत इतर पोल्ट्रीमधील कोंबड्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. प्रशासनाने केंद्राच्या दहा किलोमीटर परिघातील जवळपास सर्वच कुक्कुटपालन केंद्रातील पक्षांचे नमुने खबरदारीचा उपाय म्हणून भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन पुढील प्रक्रिया होणार आहे. यापूर्वी पोल्ट्रीमधील 34 हजाराहुन अधिक कोंबड्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. या आजाराचा मृत्यू दर अधिक आणि प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने प्रशासन अधिक खबरदारी घेत काम करत आहे.

बर्ड फ्लू रोखण्यासाठी उपाययोजनेला गती आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड नवापूर येथील पोल्ट्रीमधील कलिंग करणार्‍या ठिकाणी जाऊन पाहणी करून वेळोवेळी सूचना देत आहेत. दरम्यान, अंड्यांची मोजणीही सुरु झाली आहे. नवापूर शहरातील पोल्ट्रीमध्ये कोंबड्या नष्ट करण्याचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आणि पोल्ट्रीमध्ये काम करणार्‍या कामगारांना खबरदारीचा उपाय म्हणून टँमी फ्लुचा डोस दिला जात आहे. पक्ष्यांची संख्या नवापूर पोल्ट्रीमध्ये मोठी असल्याने ते नष्ट करण्याच्या कामाला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये वेगाने फैलाव करतो. माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होणे अत्यंत कमी असल्याचे सांगण्यात आले.

तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील पालावाला पोल्ट्री 59 हजार 600, मुस्तफा पोल्ट्री 23 हजार 251, श्रीअँश पोल्ट्री 4 हजार 200, न्यू डायमंड 25 हजार 251 असे 1 लाख 12 हजार 292 कोंबड्यांचे पथकामार्फत कलिंग करण्यात आले. नव्याने 8 पोल्ट्री अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात मुस्तफा-1, मुस्तफा-2, श्रेयस, सफा, न्यू शांती, एफसन्स, जस, शाहीन या पोल्ट्रीचा समावेश आहे. 16 पोल्ट्रीतील अहवाल आतापर्यत पॉझिटिव्ह आले आहे. त्यापैकी 10 पोल्ट्रीतील कलिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यात 3 लाख 28 हजार 215 पक्ष्यांचे कलिंग केले आहे.