नवापूरला कारमध्ये आढळला 96 हजाराचा दारुचा साठा

0

नवापूर:गुजरात राज्याकडे जाणार्‍या पांढर्‍या रंगाच्या कारमधून अवैध दारुची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना बुधवारी, 6 रोजी मिळाली होती. त्यावरुन त्यांनी पथकाला कारचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी पेट्रोलिंग करतांना कार आढळून आल्यावर तिचा पाठलाग केला. कारचालकाने नयाहोन्डा ते करंजीकडे जाणार्‍या रस्त्यावर कार सोडून पसार झाला. कारच्या तपासणीत पोलिसांना देशी, विदेशीसह 96 हजाराचा दारुचा साठा आढळून आला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारसह 3 लाख 56 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कार सोडून चालक फरार
पांढर्‍या रंगाची कारमधून (क्र.एमएच 39 डी 751) दारुची वाहतूक होत असुन ही कार गुजरात राज्यात जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी सपोनि धिरज महाजन यांना गावात पेट्रोलिंग करुन कारचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आदेश मिळताच सपोनि धिरज महाजन यांच्यासोबत पो.काँ. आदिनाथ गोसावी, दिनेश बाविस्कर, शाम पेंढारे, योगेश साळवे, चापोना महेश पवार यांनी कारचा शोध घेण्याचे काम सुरु केले. पथकाला अशा रंगाची कार दिसताच तिला थांबविण्याचा इशारा केला. ती गावातील नयाहोन्डा पुलाकडे पळून गेली. तेव्हा सपोनि धिरज महाजन यांनी ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांना गाडी थांबविण्याबाबत फोनद्वारे सांगितले. कारचा पाठलाग केल्यावर चालकाने वाहन नयाहोन्डा ते करंजी जाणार्‍या रस्त्यावर थांबवुन वाहन सोडून पळून गेला. कारची तपासणी केल्या तिच्यात 33 हजार 600 रुपयाची विदेशी दारु, 62 हजार 400 रुपयाची देशी दारु असा कारसह 3 लाख 56 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. कारवरील चालक कार सोडून पळून गेल्यावर ती कार नितीन ठक्कर यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तपास सपोनि धिरज महाजन करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सपोनि धिरज महाजन, पो.काँ. आदिनाथ गोसावी, दिनेश बाविस्कर, शाम पेंढारे, योगेश साळवे, चापोना महेश पवार आदींनी केली.

Copy