नवापूरला आंतरराज्यीय गुटखा तस्कर सक्रीय

0

नवापूर:देशात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण याच लॉकडाऊनचा गैरफायदा घेत नवापूर शहरातील आंतरराज्य गुटख्याची तस्करी करणारे सक्रीय झाले आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने गुटखा शौकिनांना गुटखा मिळत नसल्याचा फायदा तस्कर पाच रुपयाची पुडी पन्नास रुपयाला विक्री करीत आहे. त्यामुळे गुटख्याची सर्वत्र मागणी वाढल्याने गुटखा तस्कर सक्रीय झाले आहे. संबंधित विभागाचे अधिकार्‍यांचे यावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच गुजरात पोलिसांनी गुटखा तस्करांवर कारवाई करत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुजरात राज्यातील सोनगड येथे बुधवारी, 29 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अवैधरित्या गुटखा तस्करी करत असल्याची गोपनिय माहिती सोनगड पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून महामार्गावरून येणारी आयसर टेम्पोची (क्र. एमएच 39 सी 682) तपासणी केली. त्यात 84 हजार 100 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ दिसून आले. आयसर टेम्पो किंमत दोन लाख असा दोन लाख 84 हजार 100 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी रजाक अलील मेमन (वय 48, रा.लाखाणी पार्क, नवापूर, जि.नंदुरबार) जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली गुटखा तस्करी करत असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

संबंधित विभाग केवळ नावालाच
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा वाहतूक केली जात असल्याची बाब समोर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या वाहनांना परवानगी दिली. मात्र, त्याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे असल्याचे समोर आले आहे. गुटखा तस्करीची मुजोरी वाढत आहे. नंदुरबार जिल्ह्यात अन्न औषध प्रशासन केवळ नावालाच आहे की काय? अशी अवस्था निर्माण झाली आहे.

Copy