नवापुरात रिक्षावाल्याच्या इमानदारीचे सर्वांकडून कौतुक

0

नवापूर । आजच्या जगात पैशाच्या बाबतीत इमानदारीची उदाहरणे दुर्मिळ झाली आहेत. मात्र नवापूर शहरात इमानदार रिक्षा चालकाने एका प्रवाशाची बॅग पोलिसाकडे सुपूर्त करुन आपल्या इमानदारीचा प्रत्यय आणुन दिला. सुरतहून दोंडाईचाकडे जाणारे महेंद्र हिमंतसिग गिरासे हे नवापूर बसस्थानक येथे उतरले. त्यांना नवापूरहुन लवकर बस मिळत नव्हती. त्यामुळे ते बसस्थानकावरून रिक्षा करुन नवापूर रेल्वेस्टेशनला परिवारासह गेले. त्यांचाकडे 3 बॅगा होत्या. रिक्षातुन घाई-घाईत उतरत त्यांनी फक्त 2 बॅगा उचलुन रेल्वे स्थानकावर गेले. एक बॅग रिक्षात राहील्याचे त्यांचा लक्षात आले त्यांनी ऱिक्षाची शोधा शोध केली मात्र तो निघुन गेला होता.

पी.आय.पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान
त्या एका बॅगेमध्ये बँकेचे पास बुक, 9 हजार रुपये रोख, कपडे हॉस्पीटलच्या फाईली अशी सामग्री होती. दरम्यान रिक्षा चालक अब्दुल समत मुस्ताक ताई (वय 40) रा ताईवाडा नवापूर यांनी जवळ असलेले त्यांचे मिञ आनंदसिंग राजपूत यांना बॅगबद्दल माहिती दिली. त्यांनी बॅग उघडून पाहिले व बँक पासबुक वरुन महेंद्र हिमंतसिंग गिरासे रा. दोंडाईचा यांना फोन लावला. त्यांना विचारले असता त्यांनी बॅग रिक्षात राहिली असल्याचे सांगितले. यानंतर रिक्षा चालक अब्दुल यांनी व त्यांचे मिञ आनंदसिंग राजपूत यांनी बॅग नवापूर पोलीस स्टेशन येथे आणून पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी रिक्षा चालक अब्दुल समद मुस्ताक ताई यांचे कौतुक करुन फुलगुच्छ देऊन सत्कार केला