नवापुरात बंद घर फोडून सव्वातीन लाखांचा ऐवज केला लंपास

0

नवापूर। लग्नासाठी घरातील सर्व सदस्य बाहेरगावी गेल्याची संधी साधून शहरातील लाखाणी पार्क मधील शाहरूख खाटीक यांच्या बंद घरातून 3 लाख 22 हजार रुपये 200 रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. शाहरुख खाटीक हे लग्नासाठी जळगाव येथे गेले होते.

8 रोजी मध्यरात्री ते पहाटे दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. नवापूर शहरातील लाखाणी पार्क येथील टेम्पो चालक शाहरुख खाटीक हे लग्न समारंभासाठी परिवारासह जळगाव येथे गेले असल्याने बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश केला. सव्वा लाखांच्या दागिन्यासह दोन लाख रुपये रोकड मिळून सव्वा तीन लाखाचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षी बंद असलेली अनेक घरे चोरट्यांनी फोडून मोठ्या चोर्‍या केल्या होत्या. बंद घर फोडीचे सञच मागील वर्षी सुरू झाले होते. त्या झालेल्या चोर्‍यांचा अद्याप तपास लागलेला नाही. आता हे एक बंद घर फोडून चोरटयांनी यावर्षीच्या चोरीचा आरंभ केला असल्याची चर्चा आहे.