नववर्ष स्वागतासाठी सर्वत्र तरुणाई सज्ज

0

थर्टीफस्टची पार्टी रंगणार पहाटेपर्यंत : गुलाबी थंडीत रंगणार भरीत पार्ट्या : ‘कडकनाथ’ कोंबडीला सर्वाधिक पसंती

भुसावळ : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत अर्थात ‘थर्टी फस्ट’चे सेलिब्रेशन म्हणजे तळीरामांसाठी जणू पर्वणीच…नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल्ससह बिअरबार रोशनाईने व डेकोरशनने सजले असून महामार्गावरील ढाब्यांवरही जय्यत तयारी करण्यात आली आहे.खवैय्यांसाठी खास शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांचे विविध प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच ठिकठिकाणी शेतासह घराच्या गच्चीवरही भरीत पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मांसाहारी खवैय्यांची पहिली पसंत असलेल्या ‘कडकनाथ’ या कोंबडी प्रकाराला खवैय्यांची मोठी मागणी राहिली. तळीरामांसाठी जादा मद्यसाठ्याची विक्रेत्यांनी तरतूद केली आहे. मद्य पिवून होणारे अपघाताचे प्रमाण पाहता तळीरामांच्या बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासनाकडून मद्यपींविरुद्ध ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई होणार असून पेट्रोलिंग पथकाद्वारेही कारवाई केली जाणार आहे.

पहाटेपर्यंत सुरू राहणार बिअर-बार
तळीरामांच्या सोयीसाठी नववर्षाच्या पहाटेच्या पाच वाजेपर्यत परमीटरूम बिअर-बार सुरू ठेवण्यात येणार असून मद्य विक्रीच्या दुकानांना मात्र रात्री एक वाजेपर्यंत मद्य विकण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यांसाठी सुमारे 55 हजार मद्यसेवनाचे, एक दिवसांसाठी उपयोगी ठरणारे परवाने वितरीत केले आहेत. यात देशी दारूसाठी दोन रूपये तर विदेशी दारू पिण्यासाठी पाच रुपयांचा परवाना संबंधितांना घ्यावा लागणार आहे.

नो डीजे; लाऊड स्पीकरला परवानगी
डीजेला बंदी असल्याने पार्टीत डीजेचा वापर होत असल्याचे आढळल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले तर रात्री 12 वाजेपर्यंत केेवळ लाऊड स्पीकरचा वापर करता येणार असल्याचेही ते म्हणाले. शहर व तालुक्यात बनावट दारूचा पुरवठा होण्याची शक्यता पाहता राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांच्या पथकाद्वारे गस्त घालून कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून त्यासाठ खास भरीत पार्ट्या व मांसाहारी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. हॉटेल्स, बारसह ढाबे तसेच घराच्या गच्चीवर, गल्लीत व शेतात गुलाबी थंडीत या पार्ट्या रंगणार आहे. मटण-चिकण विक्रेत्यांनी आतापासून बोकड तसेच कोंबड्यांचा साठा केला तर बाजारात ‘कडकनाथ’ या कोंबडीच्या प्रकारालादेखील मोठी मागणी राहिली.

अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून होणार कारवाई
अपघात टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून 31 डिसेंबरला रात्री शहरातील विविध भागात नाकाबंदी केली जाणार आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबतच पोलिस कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. रात्री 10 नंतर शहरातील विविध भागात नाकाबंदी करून येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची कागदपत्रे, वाहन चालवण्याचा परवाना, ब्रीथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे. शहरातील बाजारपेठ, शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी केली जाणार आहे. नाकाबंदीत वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. यासोबतच पोलिसांची वाहने आपापल्या हद्दीत गस्त घालणार आहेत.

रात्री उशिरापर्यंत मिळणार दारू
31 डिसेंबरला वाईन शॉप, बिअर शॉपी रात्री एकपर्यत सुरू राहतील. तर परमिट रूम, देशी दारूची दुकाने पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहेत. त्या आशयाचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून काढण्यात आल्याने मद्यपींची सोय होणार आहे.

Copy