नववर्षात पोलिसांच्या कामाचे तास झाले कमी

0

मुंबई । शहरात सुरक्षा ठेवणारे पोलीस कर्मचारी हे प्रत्येक सणांच्यावेळी ऑन ड्युटी राहतात. 24 तासापैकी 15 ते 16 तास काम करत असतात. त्यांना पुरेसा आराम मिळत नाही. या गोष्टी लक्षात घेता नववर्षानिमित्त आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पोलिसांना एक अनोखे गिफ्ट दिले आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई पोलिसांची ड्युटी आता 8 तास करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांनी हा निर्णय घेऊन मुंबई पोलिसांना नवीन वर्षाचे गिफ्टच दिले आहे. यासोबतच पोलीस दलात काही महत्वाचे बदलही केले जाणार आहेत. याबरोबर व्हीआयपी बंदोबस्तासाठी पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द केल्या जातात.

एका पोलिस शिपायाच्या पत्राची घेतली दखल
याच पार्श्वभूमीवर देवनार पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाने आयुक्तांना 73 पानी पत्रही लिहिले होते. या पत्राची दखल घेत पोलीस आयुक्तांनी आजपासून मुंबई पोलिसांच्या ड्यूटीत बदल केला आहे. मुंबई पोलिसांवर कामाचा मोठा ताण असतो. दिवसातून 15 ते 16 तास काम करणार्‍या मुंबई पोलिसांना यापुढे आठ तासांची ड्युटी करावी लागणार आहे.

मुंबई पोलिसांच्या अखत्यारितील काही कक्षही कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी कक्ष, मालमत्ता कक्ष, वाहनचोरी विरोधी कक्ष, सोनसाखळी चोरी विरोधी कक्ष, सीआययू विभागाचे लॉजिस्टीक युनीट, तसेच दोन सशस्त्र बल गट कायमस्वरुपी बंद होणार आहेत.