नवरात्र उत्सवात योगेश्वरी मंदिरात आकर्षक रोषणाई; भक्तांची गर्दी

0

अंबाजोगाई : आई राजा उधोउधो, योगेश्वरी देवीचा उधोउधो या जयघोषात घटनास्थापना झाल्यानंतर मोठ्या भक्ती भावाने लाखो भाविक योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. रात्री देवीचा परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून विद्युत रोषणाईने सजलेले मंदिर भाविकांचे लक्षवेधून घेत आहे. योगेश्वरी मातेच्या नवरात्र महोत्सवास मोठी परंपरा असून मोठ्या थाटामाटात देवल कमिटीच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर स्थानिक कलावंतांचे भजन,किर्तन, प्रवचन, पुजा विधी आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. दिवसभरात लाखो भाविक सुख-समाधानाने देवीसमोर नतमस्तक होत आहेत. अनेक तरूण देवीच्या जयघोषात श्रीफळ बांधणीसाठी गर्दी करत आहेत.

दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांच्या रांगा वाढतच चालल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी अभिषेक देवीच्या नित्योपचार पुजा संपन्न झाल्यानंतर सकाळपासुनच दर्शनासाठी रांगा लागतात. भक्तांचे अत्यंत शांततेत होणारे दर्शन हे कौतुकास्पद असून मंदिर परिसरात सर्वत्र चोक पोलिस बंदोबस्त तैनात केला असून जागोजागी पोलिस पहारा आणि नाकेबंदी करण्यात आली आहे. आगामी काळात वाढणारी गर्दी लक्षात ठेवून देवल कमिटी नियोजन करीत आहे.

Copy