नवरात्रीनिमित्त शहरातील देवीची मंदिरे सजली

0

ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी मातेची नऊ रूपे पाहायला मिळणार

पुणे : नवरात्री उत्सवाची बुधवारी (दि.10) घटस्थापनेपासून सुरू होत आहे. त्यासाठी शहरातील विविध देवीची मंदिरे सजली आहेत़. ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी मातेच्या मंदिराची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या आवारात विद्युत रोषणाई, मांडव व रंगबेरंगी कापडाने सजावट केली आहे. घटस्थापनेला पहाटे पाच वाजता घट बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर महापूजा
झाल्यावर 6 वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येईल.

घटस्थापनेपासून तर दसर्‍यापर्यंत भाविकांना जोगेश्‍वरी मातेची नऊ रुपे पाहायला मिळणार आहेत. या नऊ रूपांमध्ये दुसर्‍या माळेला शेषासनी, तिसर्‍या माळेला व्याघरंबरी, चौथ्या माळेला वैष्णवी, पाचव्या माळेला अश्‍वाअरुडा, सहाव्या माळेला सरस्वती, सातव्या माळेला लक्ष्मी, आठव्या माळेला दुर्गा व दसर्‍याला अँग्री देवी अशा विविध रुपात देवीचे दर्शन घेता येणार आहे. दसर्‍याला 18ऑक्टोबर रोजी तांबडी जोगेश्‍वरी मातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

महालक्ष्मी मंदिरात रोषणाई

नवरात्रोत्सवात सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात बुधवारी सकाळी साडेसात वाजता बी़व्हीज़ी़ संचालक हणंमतराव गायकवाड यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे़. सायंकाळी 6.30 वाजता सहपोलिस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिराच्या आकर्षक विद्युत रोषणाईचे उद्घाटन होणार आहे. उत्सवाच्या काळात होणार्‍या कार्यक्रमाची माहिती नवरात्रोत्सव प्रमुख संस्थापक विश्‍वस्त भरत अगरवाल, अ‍ॅड़ प्रताप परदेशी, तृप्ती अगरवाल यांनी दिली.

दुसर्‍या दिवशी सकाळी मंदिरासमोरील रस्त्यावर 15 हजार विद्यार्थ्यांचे सामुहिक सुक्त व अथर्वशीर्ष पठण होणार आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांना अल्पोपहार व शालेय वस्तु भेट देण्यात येणार आहे. धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे व फिनोलेक्स उद्योग समुहाच्या विश्‍वस्त रितु छाब्रिया व संगीतकार नरेंद्र भिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. महिला पोलिसांचा सामूहिक ओटी भरण, महाआरती, अंध, अपंग शिक्षकांच्या हस्ते महालक्ष्मीची आरती करण्यात येणार आहे़. महापालिका महिला सफाई कामगारांचा सत्कार, कन्यापूजन, स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीचा विशेष सन्मान, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, संस्थांचा सन्मान, ढोल ताशाची प्रात्याक्षिके, अंध शाळेच्या विद्यार्थ्यांची भजनसंध्या असे कार्यक्रम आयोजित केले आहेत़. विजयादशमीच्या दिवशी देवीला खास महावस्त्र (सोन्याची साडी) परिधान करण्यात येणार आहे़.

Copy