नवनवीन हेअर कट्सची तरुणांमध्ये ‘क्रेझ’ वाढली

खेळाडूंसह अभिनेत्यांचा प्रभाव

शिंदखेडा। सलूनच्या खुर्चीवर मुलांना बसविल्यानंतर एकदम बारीक करा, मिल्टी कट मारा, त्यांच्या केसाला लई वाढ आहे असे ऐकविले जाणारे संवाद आता इतिहास जमा झाले आहेत. आजकाल हायफाय सलूनच्या भारी खुर्चीवर बसून वन साईड, टू साईड, अन् हाय लाईट जमाईराजा कटींग करणार्‍या तरुणांसह शाळकरी मुलाची संख्या मोठी आहे. अशा कट्ससाठी ग्रामीण भागात 50 ते 70 रुपये मोजले जातात. आजची स्मार्ट तरुणाई आपल्या केस दाढी मिशांच्या बाबतीत तेवढेच जागरूक असल्याचे दिसते. त्यामुळे नवनवीन हेअर कट्सची तरुणांमध्ये ‘क्रेझ’ वाढली आहे. तसेच खेळाडूंसह अभिनेत्यांचा प्रभावही तरुणांवर पडत आहे.

चित्रपट मालिकांमधील अभिनेते, गायक, लोकप्रिय खेळाडूंनी केलेल्या हेअर कट्सची कॉपी केली जात आहे. यासाठी पारंपारिक सलूनच्या जागी हेअर स्टुडिओ सुरू झाले आहेत. अगदी सोन्याच्या दुकानाला लाजवेल असे फर्निचर या दुकानामध्ये आहे. अतिशय आखीव रेखीव चकचकीत अशा दुकानांमधुन तशी सेवाही मिळत आहे. त्यासाठी अधिकचे पैसे मात्र मोजावे लागत आहेत. शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले कारागीर अभिनेते खेळाडूंनी केलेली हेअरस्टाईल सेम कॉपी करत तरुणाच्या डोक्यावर करीत आहेत. यामुळे आजच्या तरुणाईचा एकूणच लुक बदलला आहे. मधुनच कमी झालेले केस, सरळ उभा केलेले केस, एका बाजूने कमी केलेले, दोन्ही बाजूंनी कमी केलेले, ठराविक केसांना वेगळा रंग लावलेले तरुण मुले आता शाळा कॉलेजात दिसू लागले आहेत.

गायकासह खेळाडूंची हेअर स्टाईलची कॉपी
लोकप्रिय गायक आणि खेळाडूंनी केलेली हेअर स्टाईल तरुण कॉपी करत आहेत. यामध्ये गायक बादशहा हनी सिंग यांच्या हेअर स्टाईल लोकप्रिय आहे. शिंदखेडा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यावर असे अनेक बादशहा अन् हनी सिंग दिसत आहेत.

सलुनचे सौंदर्यही आता खुलले…!
काही काळापूर्वीपर्यंत दाढी मिशा काढून गुळगुळीत चेहरा ठेवण्याची फॅशन लोकप्रिय होती. यात आता थोडा बदल झाला आहे. रुबाबदार दाढी अन् मिशा ठेवण्यास तरुणांची पसंती मिळत आहे. या दाढी मिशालाही विशिष्ट शेप दिला जात असल्याने आकर्षकता येत आहे. दोन आरसे, दोन खुच्र्या, कात्री, कंगवा असे पारंपरिक रुप असलेल्या सलुनचे सौंदर्यही आता खुलले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात लाखो रुपये किमतीच्या गाळ्यात चकचकीत काचा, अन् आकर्षक फर्निचर, अत्याधुनिक उपकरणे, तज्ञ कारागीर असा सारा थाटमाट आला आहे. याठिकाणी दिल्या जाणार्‍या सुविधांसाठी पैसे मोजावे लागत असेल तरी या दुकानामधुन तरुणांची मोठी गर्दी दिसून येते.

हेअर स्टाईलमध्ये येणारे नवीन ट्रेंड पालकाच्या पचनी पडणारे नसले तरी सगळीकडे मुले अशा पद्धतीने केस कापत असल्याने पालकही हतबल झाले आहेत. मुलाला विरोध केला तर सगळ्याची हेअर स्टाईल अशीच आहे. या युक्तिवादाला उत्तर देणे अवघड ठरत आहे. अनेकदा मुलांनी केलेली हेअरस्टाईल बदलून घेण्यासाठी पालक स्वतः सलूनच्या दुकानात येतात. मुलांच्या हेअरस्टाईलचा हा नवीन ट्रेंड हळूहळू रुढ होत आहे. आजच्या तरुणाईचा लुक बदलून गेला आहे.
-दिनेश बोरसे, शिंदखेडा