नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिले ३० हजार कोटींचं ‘गिफ्ट’

0

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली : राफेल कराराच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीला ३० हजार कोटींचं गिफ्ट दिले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला. त्याआधी राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती.

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याआरोपाचा दाखला देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर थेट निशाना साधला. मोदी खोटं बोलत असल्याचे ओलांद यांच्या विधानावरून स्पष्ट झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षाने आपल्या पंतप्रधानांना चोर म्हटले असून नेहमी भरभरून बोलणारे आपले पंतप्रधान या गंभीर आरोपावर मौन बाळगून आहेत. हा सगळा प्रकार धक्कादायक असून ओलांद यांच्या आरोपावर मोदींना स्पष्टीकरण द्यावेच लागेल, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

ओलांद यांच्या म्हणण्यानुसार राफेल करार करण्यासाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड करण्यात फ्रान्सची कोणतीही भूमिका नव्हती. भारत सरकारकडून हा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनीच अनिल अंबानी यांच्या कंपनीला ३० हजार कोटींचं हे गिफ्ट दिल असल्याचे स्पष्ट होते.तसं नसल्यास मोदींनी सत्य समोर ठेवायला हवं, असे राहुल गांधी सांगत मला पंतप्रधानांच्या खुर्चीचे रक्षण करायचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ओलांद आणि मोदी यांच्यात वन-टू-वन बैठक झाली होती. त्यामुळेच ओलांद यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे मानावे लागणार असून आपले पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत, असे आता भारतातील जनतेलाही वाटू लागले आहे. त्यामुळे मोदींना यावर बोलावंच लागेल, असेही राहुल म्हणाले. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनाही राहुल यांनी लक्ष्य केले. संरक्षण मंत्री आधी विमान खरेदीदर सांगायला तयार होत्या मात्र नंतर त्यांनी नकार दिला. याचाच अर्थ त्याही खोटं बोलत असल्याचा ,आरोप राहुल गांधी यांनी केला.