नराधमांना फाशीच!

0

नवी दिल्ली : संपूर्ण देश हादरवून सोडणार्‍या निर्भया सामूहिक बलात्कार व नृशंस हत्याकांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालय व दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. चारही आरोपी अक्षय ठाकूर, मुकेश सिंह, पवन गुप्ता व विनय शर्मा यांची फाशीची शिक्षा न्यायपीठाने कायम ठेवली आहे. या चौघांच्या नृशंसपणाबद्दल त्यांना माफ करता येणारे नाही. ते दयेस पात्र नाहीत, असे न्यायपीठाने ठणकावले. तीन सदस्यीय न्यायपीठापैकी न्यायमूर्ती दीपक मिश्रा व न्यायमूर्ती अशोक भूषण यांचे एकमत आले तर न्यायमूर्ती आर. भानुमती यांचे मत वेगळे होते, अशी माहितीही निर्णय देताना न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी दिली. दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर आरोपींतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 27 मार्चरोजीच सुनावणी पूर्ण झाली होती. तथापि, न्यायपीठाने आपला निर्णय राखीव ठेवला होता. त्यानंतर शुक्रवारी तीन सदस्यीय न्यायपीठाने आपला निर्णय जाहीर करत, आरोपींची याचिका फेटाळून लावली. न्यायालय निकाल देत असताना, निर्भयाचे आई-वडिल न्यायालयात हजर होते. त्यांच्या भावनांचा बांध फुटला तर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत या निकालाचे स्वागत केले.

सहापैकी एकाची आत्महत्या, एक अल्पवयीन सुटला!
16 डिसेंबर 2012च्या रात्री नवी दिल्लीत वैद्यकीय शाखेच्या 23 वर्षीय तरुणीवर सहा आरोपींनी अमानुष सामूहिक बलात्कार केला होता. तसेच, तिच्यासह तिच्या मित्रावर नृशंस हल्ला चढविला होता. जंगली श्‍वापदाला लाजवेल अशाप्रकारे नराधमांनी या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले होते. तिच्या गुप्तांगात रॉड खुपसून अन् तिचे लचके तोडून तिला मरणासन्न व नग्नावस्थेत तिच्या मित्रासह रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. या नृशंस घटनेने संपूर्ण देश हादरला होता. तिच्यावर शिकस्तीचे वैद्यकीय उपचार केल्यानंतरही तिचे प्राण वाचू शकले नव्हते. सिंगापूर येथे तिची प्राणज्योत मालवली होती. सहाही नराधमांवर अपहरण, सामूहिक बलात्कार व खुनाचे आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी साकेतच्या द्रूतगती न्यायालयात झाली. एकूण सहा आरोपींना जेरबंद करण्यात आले होते. त्यापैकी मुख्य आरोपी तथा बसचालक राम सिंह याने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने सुधारणागृहात तीन वर्षांची शिक्षा पूर्ण करून तो सुटला आहे. तर उर्वरित चार आरोपींवर खटला चालविण्यात आला. त्यात अक्षय ठाकूर, मुकेश सिंह, पवन गुप्ता व विनय शर्मा या आरोपींचा समावेश होता. या आरोपींना द्रूतगती न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. दिल्ली उच्च न्यायालयानेही याच शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर आरोपींनी या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

त्यांना माफ करता येऊच शकत नाही…
सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण तीन सदस्यीय न्यायपीठाकडे सोपविण्यात आले होते. तर न्यायपीठाने मदतीसाठी न्यायमित्रही नियुक्त केले होते. सर्वोच्च न्यायालयाने द्रूतगतीनेच या प्रकरणावर सुनावणी घेतली. प्रत्येक सोमवार, शुक्रवार आणि शनिवारीदेखील या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. जवळपास एक वर्ष सुनावणी सुरु होती. 27 मार्चरोजी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली; परंतु न्यायपीठाने आपला निकाल राखीव ठेवला. शुक्रवारी अखेर न्यायपीठाने आपला निकाल दिला. हे सामूहिक बलात्कार व हत्याकांड म्हणजे ‘सदमे की त्सुनामी‘ (मानवतेला त्सुनामीपेक्षाही मोठा धक्का) असल्याने न्यायपीठाने सांगितले. त्यांना माफ करता येऊच शकत नाही, असे सांगून न्यायपीठाने आरोपींची याचिका फेटाळून लावली व कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली. आता आरोपींपुढे राष्ट्रपतींकडे दयायाचना करण्याचाच मार्ग उरला आहे, अन्यथा त्यांना फाशी अटळ आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर न्यायालयात उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

ठळक घडामोडी
* 16 डिसेंबर 2012 : दिल्लीतील वसंत विहार परिसरात धावत्या बसमध्ये सहाजणांकडून वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, तिचा खून तसेच तिच्या मित्रावर प्राणघातक हल्ला.
* 18 डिसेंबर 2012 : राम सिंह, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता या आरोपींना अटक, 21 डिसेंबरला एका अल्पवयीन आरोपीसही अटक, सहावा आरोपी अक्षय ठाकूर याला बिहारमधून अटक
* 29 डिसेंबर 2012 : मृत्यूशी 13 दिवसांच्या संघर्षानंतर निर्भयाची सिंगापूर येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली, देश शोकसागरात बुडाला.
* जानेवारी 2013 : पाच आरोपींविरुद्ध खून, सामूहिक बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा आदी गंभीर आरोपांनुसार आरोपपत्र दाखल. द्रूतगती न्यायालयाने पाच आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चित केले.
* 11 मार्च 2013 : मुख्य आरोपी राम सिंह याची तिहार कारागृहात फाशी घेऊन आत्महत्या.
* 31 ऑक्टोबर 2013 : बाल न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला सामूहिक बलात्कार व खूनप्रकरणी दोषी ठरवले. तीन वर्षाकरिता बालसुधारगृहात रवानगी.
* सप्टेंबर 2013 : द्रूतगती न्यायालयाने चार आरोपींना 13 गुन्ह्यांकरिता दोषी ठरवले. चौघांनाही फाशीची शिक्षा ठोठावली.
* 13 मार्च 2014 : दिल्ली उच्च न्यायालयानेही या चौघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले.
* 27 मार्च 2017 : सर्वोच्च न्यायालयात या चौघांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
* 5 मार्च 2017 : सर्वोच्च न्यायालयाच्या त्रीसदस्यीय न्यायपीठाने चौघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले.