नद्या वाचवण्यासाठी पर्यावरण पूरक प्रकल्पांची आवश्यकता

0

पिंपरी: कोरोनाची महामारी सुरु झाल्यापासून सर्व उद्योगधंदे बंद झाले. एकही कंपनी सुरु नव्हती. त्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण विभाग यांच्या मार्गदर्शनाने व टाटा मोटर्स पर्यावरण विभागच्या सहकार्याने व ECA (इसिए ) च्या पुढाकाराने शहरातील इंद्रायणी ,पवना आणि मुळा नद्यांचे २३ मार्च पासून ३ जुन २०२० च्या कालावधीत नदीच्या पाण्याचे नमुने तपासून एक नवीन माहिती हाती आली.

शहरातील सर्व नद्या ह्या औद्योगिक घातक रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे ९० % प्रदूषित होत आहेत.
ह्या औद्योगिक घातक रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे प्रदूषित होणाऱ्या आपल्या सर्व नद्या वाचवायच्या असतील तर उद्योग धंद्यावर नियंत्रण ठेवून CETP/ ETP सारखे प्रकल्प MIDC ने त्वरित उभारणे गरजेचे आहे. २००४ पासून ECA ह्या बाबत सतत PCMC व MPCB सोबत तगादा लावून आहे पण MPCB ची बोटचेपी धोरणे CETP/ ETP साठी पूरक नसल्याची प्रचीती येत आहे .
अनेक वेळा MPCB च्या अधिकार्यांना या विषयी इसिए प्रतिनिधीनी स्वतः भेटून चर्चा केली आहे पण उद्योजकांना सांभाळण्याची MPCB त्यांची कार्य पद्धती CETP होऊ देत नाही असे दिसून येत आहे. जर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ MIDC च्या हातातले बाहुले बनले असेल व अधिकारी विकले गेले असतील तर काय आपल्या नद्यांचे संवर्धन होणार ? हा प्रश्न फक्त आपण मागील दोन दशका पासून विचारत आहोत.
देशातील सर्व नद्या आज प्रदूषित झाल्या आहेत त्यामुळे आपण काही वेगळे बोलणार आहोत असे नसून तीच समस्या वेगळ्या दृष्टीकोनातून पहावयास हरकत नाही.आपण प्रथम आपला डोळ्यावरचा धुरकटलेला चष्मा काढून स्वच्छ केला पाहिजे त्यासाठी साबण व स्वच्छ कापडाचा वापर करावाच लागणार आहे.
काही प्रश्नांची उत्तरे तपासू …..
१) नदी मध्ये कचरा कोण टाकतो ?
२) नदीत सांडपाणी कोणाच्या घरातून येते ?
३) नदीत पाणी सोडण्या आगोदर आपण काय काळजी घेणे आवश्यक आहे ?
४) उद्योग धंद्यात निर्माण होणारे घातक सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया द्वारेच बाहेर सोडावे हि कोणाची जवाबदारी आहे आणि त्यासाठी कोणी काय करायला पाहिजे ?
५) नदी प्रवाह आपल्या शहरातून प्रवास करतानाच दुषित का होतो आहे ?
६) स्वतःच्या गावातील नद्या स्वच्छ ठेवण्याची जवाबदारी झटकून शेकडो मैल दूर असलेली गंगा नदी स्वच्छ करण्या साठी दोन दिवस जाणारे आपण असे का विसरतो आहोत कि आपण आपल्या गावातील नदीतलेच पाणी पितो गंगा नदीतले नाही मग तिला स्वच्छ करून मग नंतर जावू आपली पवित्र गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी.
७) आपण सरकारी यंत्रणेवर कधी राजकीय ताकतीचा आधार घेवून दबाव आणला आहे का ? सुरवात तरी केली आहे का तसा दबाव आणण्याची?
८) हे सर्व नियमित पणे पाहण्याची / तपासण्याची जवाबदारी कोणाची ? व तो दिलेले ते तपासणीचे काम करतो आहे अथवा नाही हे तपासण्याची जवाबदारी कोणाची ? प्रश्न गहन आहे पण उत्तर सोपे आहे ते म्हणजे …. हि जवाबदारी आपल्या सारख्या सजग नागरिकांची आणि सामजिक संघटनांची, तरी पण आपण हे सोपे काम करत नाही मग आपण का दोष देतो आहोत इतराना नदी सुधार बाबतीत ?
आपण आता जरा सविस्तर बोलू ….
१) शहरात सांडपाणी रोज मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते व ते सर्व सांडपाणी कोणत्याही शहरात एकत्रित जमा करून मलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पा पर्यंत नेले जात नाही त्यामुळे जमेल तसे नदी,नाले, ओढे या मध्ये सोडले जात आहे.
शहरातील घरगुती प्रकारचे सांडपाणी योग्य पद्धतीने जर हाताळले तर नदी संवर्धनाचा १० – २०% टक्के भर कमी होईल.
२) शहराजवळील अथवा नदी च्या आसपासचा कारखानदारीचा परिसर जर आपण व्यवस्थित हाताळला व तेथील घातक रासायने असलेले सांडपाणी योग्य पद्धतीने हाताळले तर आपली एकही नदी प्रदूषित होणार नाही.

३) शहरात असलेले मोठे गृह प्रकल्प आपण जर तपासले तर त्यातील मलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत असे जाणवत नाही. कित्येक ठिकाणी ते प्रकल्प फक्त शोभेची वस्तू म्हणून अस्तित्वात आहेत.
४) शहरात निर्माण होणारा रोजचा सर्व प्रकारचा ओला कचरा व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने जिरवला तर आपल्या शहरातील जल प्रदूषण नियंत्रण होऊ शकते.
५) नदीतील पाणी प्रदूषित झाले नाही कि आपोआपच आपल्या नदीतील जैव विविधता वाढत राहते व आपणास निसर्गच स्वतः मदत करतो नदी संवर्धन कार्यात.
६) नदी पात्रातील अतिक्रमणे व विविध प्रकारचा कचरा साठवणूक (बांधकाम राडारोडा) जर आपण पूर्णपणे थांबविली तर मात्र नदी चे मनमोहक सौंदर्य आपणास लगेच जाणवेल.
७) नदी सुशोभिकरण करण्या यैवजी नदी च्या दोन्ही तीरावर भरपूर झाडे लावल्यास नदीतील पाण्याची शुद्धता वाढत राहणार आणि सर्व प्रकारचे जीव नदीवर वास्तव करण्यास सुरवात होईल व नदी सुंदर दिसायला लागेल.
आपण कित्येक कोटी रुपयांचा नदी सुधार प्रकल्प फक्त मोठ्या रकमांच्या उलाढाली साठी व सिमेंटचे निष्कारण कठडे नदी किनारी बांधून मोठे अर्थकारण करू शकतो व तोच घाट राजकीय मानसिकतेचा आज दिसत आहे या मुळे नदी सुधारणा होईल अथवा नाही हे माहित नाही पण राजकीय मंडळी श्रीमंत होईल हे नक्कीच आहे सध्याची परिस्थितीनुसार.
नदी स्वच्छता करणे सोपे आहे पण ती खराब व प्रदूषित होणार नाही या बाबत मानसिकता बनविण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे .
आज पर्यंत दर वर्षी प्रत्येक नदीत मार्च ते जुन ह्या कालावधीत करोडो मासे व जलचर मरण पावल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत पण मार्च २०२० ते जुन २०२० ह्या कालावधीत एकही असा प्रसंग घडला नाही याचे कारण काय ? हे आपल्या लक्षात आले असेलच कि आपल्या नदीत औद्योगिक घातक रसायन मिश्रित सांडपाणी या कालावधीत आलेच नाही व ह्यामुळे दुर्घटना घडल्या नाही.

लेखक, विकास पाटील(पर्यावरण तज्ञ)चेअरमन इसिए

Copy