नदी प्रदुषणात घरगुती कचर्‍याचाही वाटा

0

प्रदूषण मंडळाचा दावा; दहा नाल्यांची तपासणी

पुणे : शहरातील नद्यांच्या प्रदूषणात सर्वाधिक वाटा हा घरगुती कचर्‍याचा असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे करण्यात आला आहे. मंडळातर्फे शहरातील दहा प्रमुख नाल्यांतील पाण्याचे नमुने तपासणीतून ही माहिती समोर आली आहे.

मंडळातर्फे शहरातील पाण्याची नियमितपणे तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान शहराच्या विविध भागांतील सुमारे दहा ठिकाणी नाल्यांची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी पाण्यामध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने पाणी प्रदूषित
होत असल्याचे निरीक्षण मंडळाने नोंदविले आहे.

तसेच नदीतील पाण्याच्या प्रदूषणात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 47 टक्के वाटा हा सांडपाणी आणि त्याद्वारे वाहून आलेल्या घरगुती कचर्‍याचा असल्याचेही मंडळातर्फे नमूद केले आहे. प्रक्रियाविरहित सांडपाणी थेट नदीत सोडले जाऊ नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तसेच हे प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे या संस्थांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, तूर्तास नदीचे होणारे प्रदूषण ही गंभीर समस्या बनत आहे, अशी माहिती मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे यांनी दिली.

Copy