नदीसुधार प्रकल्प महापालिकेमार्फत त्वरित राबवावा – नगरसेवक संदीप वाघेरे

0

पिंपरी : सह्याद्रीच्या कुशीत उगम पावणारी पवनामाई आज पिंपरी-चिंचवड शहरातील 22 लाख लोकांची तहान भागवत आहे. मावळ तालुक्यातील गेव्हंडे, आतवन, आपटी या गावांच्या हद्दीतून जाणारा एक छोटासा झरा हे पवनामाईचे उगम स्थान आहे. मावळ तालुक्यातून पवना धरणाच्या पायथ्याशी असलेल्या काळे कॉलनी गावाच्या हद्दीतून पवनेच्या प्रवाहास सुरुवात होवून पुढे मजल- दरमजल पवनामाई किवळे गावातून पिंपरी चिंचवड हद्दीत प्रवेश करते. पुढे रावेत, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, सांगवी, दापोडी, या भागातून पवना नदी वाहत जाते. शहरात प्रवेश केल्यानंतर पवना माईची काय अवस्था होते, हे तुम्हाला सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही. तरी महापालिका आयुक्तांनी या विषयीची गांभीर्याने दखल घेऊन पवना व इंद्रायणी नदीला स्वच्छ, ताजी, टवटवीत व नैसर्गिक पद्धतीने वाहती ठेवण्यासाठीनदीसुधार प्रकल्प महापालिकेमार्फत त्वरित राबवावा, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

नदीची झाली गटारगंगा

नदीच्या शेजारील नाल्यांचे पाणी थेट नदीत सोडले जाते काही ठिकाणी सांडपाणी स्वच्छ करून पुन्हा नदीत सोडायचे काम तेवढे महापालिका करीत असते. पण केले जाणारे काम हे योग्य रीतीने होत आहे की नाही हे पाहण्याचा त्रास मात्र संबंधित विभागाकडून घेतला जात नाही. शहरातून अंदाजे 25 किमी. वाहणार्‍या पवनामाई स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुध्दा नदी पुन्हा जैसे थे परिस्थितीत राहते. पवना नदीची अक्षरशः गटारगंगा अशी अवस्था संबंधित विभागाकडून करण्यात आल्याची दिसून येत आहे. नदीतील गाळाच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. करोडो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र उभारूनही घाणपाणी, मैला,सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्यामुळे पाण्याला प्रचंड दुर्गंधी निर्माण झालेली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नदीतील जलचर प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. इंद्रायणी नदी पात्रामध्ये मासे मरून पडल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत.

पर्यावरण विभागाची डोळेझाक

याबाबत मे महिन्यात एन.सी.वाय.एन्टरप्राईजेस या संस्थेमार्फत जलनिस्सारण नलिका तोडून सांडपाणी थेट नदीमध्ये सोडल्याची तक्रार केली होती. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे स्मरणपत्रही दिले होते. या संस्थेमार्फत जलनिस्सारण नलिका तोडण्याचे कोणत्याही विभागाचे आदेश नसताना मनमानी कारभार करून ही नलिका तोडण्यात आली होती. परंतु पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली. पर्यावरण विभागाला पवना नदीचे पुढे काय होणार आहे. याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. जलपर्णीच्या बाबतीत बोलावे तेवढे कमी आहे. पवना व इंद्रायणी नदीमध्ये जलपर्णी प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला जावून नागरिकांना डासांच्या स्वरुपात त्रास सहन करावा लागत आहे. नदीपात्रामध्ये कचरा मोठयाप्रमाणात टाकला जातो. मैलापाणी, सांडपाणी, घाणपाणी तसेच कारखान्यांमधून रसायन मिश्रित पाणी थेट नदीपात्रामध्ये सोडले जात आहे. नदीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आढळून येत आहे.

प्रशासनाचा हलगर्जीपणा

सध्याची परिस्थिती पाहिली तर येणार्‍या पुढील काळामध्ये कोणकोणत्या भीषण समस्येला सामोरे जावे लागणार आहे याची कल्पना देखील करवत नाही. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणार्‍या महापालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून वाहणार्‍या व शहराची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पवना व इंद्रायणी नदीच्या बाबतीत प्रशासन एवढे उदासीन का आहे, याची खंत वाटते आहे. नदीप्रदुषण टाळण्यासाठी आजपर्यंत कित्येक तरी पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी आवाज उठवला, जनजागृती केली, महापालिकेला विनंत्या केल्या परंतु संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याकडून आलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवली आहे. प्रशासन नदीसुधार करणेबाबत एवढे गाफील कसे काय असू शकेल असा प्रश्‍न पडतो. जलपर्णी, कचरा, प्लास्टिक, निर्माल्य, रासायनिक पाणी, हॉटेलमधील उरलेले अन्न, नदीपात्रातील वाढते अतिक्रमण, प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे पवनामाईचा श्‍वास कोंडू लागल्याचे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत

Copy