नदीपात्रातील मेट्रो मार्गाची पाहणी

0

पुणे : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या नदीपात्रातील मार्गाची पाहणी केली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संपूर्ण 1.4 किलोमीटरचा नदीपात्रातील मार्गातील मेट्रोच्या कामाचा पायी चालत आढावा घेतला आणि काही सूचना केल्या.

नदीपात्रातील मेट्रो मार्गाविरोधातील याचिका निकाली काढताना एनजीटीने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नेमण्याचे निर्देश दिले होते. दर दोन महिन्यांनी समितीने प्रत्यक्ष पाहणी करून पर्यावरणाला धोका पोहोचत नाही ना, याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीने नदीपात्रातील कामाची प्रथमच पाहणी केली. डॉ. म्हैसेकर यांच्यासह इतर सदस्यांनी पायी मेट्रोच्या कामाची माहिती करून घेतली. महामेट्रो पर्यावरणाच्या संरक्षणासंदर्भात घेण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची कल्पना त्यांना देण्यात आली. ही पाहणी केल्यानंतर ’एनजीटी’ने दिलेल्या निर्देशांनुसार सर्व प्रक्रिया राबविण्यात यावी आणि त्यात सातत्य राखले जावे, अशा सूचना त्यांनी केल्या. या समितीमध्ये डॉ. रितेश विजय, डॉ. ए. बोनियामिन, प्रशांत खांडकेकर, रामनाथ सुब्रमण्यम आणि अतुल गाडगीळ यावेळी उपस्थित होते.

Copy