नदालच्या साथीने सामना खेळण्याची फेडरची इच्छा!

0

चेकोस्लाव्हिया : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नदालला नमवीत १८ वे ग्रँडस्लॅम मिळविलेला स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याने दुहेरीत कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल याच्या साथीने सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सप्टेंबरमध्ये चेकोस्लाव्हियातील प्राग येथे होत असलेल्या नवीन टूर्नामेंटच्या प्रमोशनसाठी फेडरर येथे आला आहे. महान टेनिसपटू रॉड लेव्हर याच्या नावाने ही स्पर्धा घेतली जात असून त्यात बियान बोर्गच्या युरोपियन टीममधून फेडरर खेळणार आहे. ही टीम जॉन मॅकॅन्रेाच्या शेष विश्व टीमबरोबर खेळणार आहे.

ही स्पर्धा २२ ते २४ सप्टेंबर या काळात होत आहे. त्यात तीन एकेरी व एक दुहेरी असे सामने होणार आहेत.राफेल नदालसह अन्य बडे खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. यावेळी बोलताना फेडरर म्हणाला, नदालबरोबर खेळणे मला नेहमीच आवडते. त्याच्याबरोबरची मॅच नेहमीच खास ठरते. यावेळी नव्या टूर्नामेंटमध्ये दुहेरी सामन्यात नदाल माझा सहकारी असेल तर मला जास्त आवडेल. ही स्पर्धा १९६९ साली एकाच वर्षात चार ग्रँडस्लॅम मिळविलेल्या रॉड लेव्हरच्या नावाने घेतली जात आहे. आम्ही जगाचे प्रतिनिधित्व करावे अशी रॉडची इच्छा असल्याचेही त्याने सांगितले.