नगावनजीक महामार्गावर लूट : दोघे आरोपी धुळे पोलिसांच्या जाळ्यात

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील नगावजवळ शस्त्राच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटण्यात आल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोघा आरोपींच्या धुळ्यातील देवपूर पश्‍चिम पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मास्तर उर्फ किरण बालू सोनवणे (23, चांदसे, ता.शिरपूर) व मोन्या उर्फ सुनील वामन पारधी (23, लक्ष्मी चौक, इंदिरा नगर, होमगार्ड ऑफीस समोर, गोंदूर रोड, देवपूर, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून लुटीतील सहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल व दोन हजारांची रोकड जप्त करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक
तक्रारदार सुनील अर्जुनदास तलरेजा (कुमार नगर, साक्री रोड, धुळे) यांना 26 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजता आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने मारहाण करीत त्यांच्याकडील चार हजारांची रोकड व सहा हजारांचा मोबाईल लांबवला होता. धुळे अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्‍चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक योगेश राजगुरू, उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद, मुक्तार शेख, किरण जगताप, किरण कोठावदे, परशुराम पवार, रमाकांत पवार, सुनील राठोड, निलेश हालोरे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Copy