नगरोत्थान योजनेंतर्गत 16 कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन

0

धुळे । महाराष्ट्र सुवर्ण जयंती राज्य नगरोत्थान योजनेंतर्गत मालेगावरोड-चाळीसगाव रोड-वडजाई ते नॅशनल हायवे पर्यंत असलेल्या सुमारे 16 कोटी रुपये खर्चाच्या 100 फुटी रस्ता कामाचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा भुमिपुजन समारंभ 5 एप्रिल रोजी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी महापौर कल्पना महाले, महापालिका आयुक्त संगिता धायगुडे, उपमहापौर उमेर अन्सारी, माजी महापौर मोहन नवले, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, महिला व बालकल्याण सभापती इंदूबाई वाघ, अरशद शेख, गंगाधर माळी, चंद्रकला जाधव,संदीप महाले, चंद्रकांत सोनार, मनोज मोरे आदी उपस्थित राहतील.

16 रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव
शहरातील प्रमुख 16 रस्त्यांचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. याकामी शहरातील प्रमुख 16 डिपी रस्त्यांसाठी 43 कोटी 72 लाख 34 हजार 964 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यात शासनाचा 70 टक्के तर मनपाचा 30 टक्के हिस्सा आहे. 100 फुटी रस्ता हा रहदारीच्या दृष्टिने अत्यंत महत्वपुर्ण असून सुमारे 3 ते 4 प्रभागातून हा रस्ता जाणार आहे. वाहतूकीच्या दृष्टिने हा रस्ता अत्यंत महत्वपुर्ण असून रस्त्याची लांबी 2450 मिटर तर रुंदी 30 मिटर आहे. हा रस्ता चार पदरी असून रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजक, वृक्षारोपण,संपूर्ण रस्त्यावर मध्यभागी विद्युत व्यवस्था, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूस गटारी, नामफलक अशा विविध सुविधा असून या कामाचा खर्च अंदाजे 16 कोटी रुपये आहे. सदर काम 20.51 टक्के कमीने मे.ए.बी.वाघ यांच्यामार्फत करण्यात येत आहे. रस्त्याच्या भूमिपुजन प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी महापौर जयश्री अहिरराव, कमलाकर अहिरराव, दिनेश शार्दुल, सतिष महाले, जुलाहा रश्मीबानो, दिपक शेलार, फिरोज शेख, उपायुक्त रविंद्र जाधव, एच.पी.कवठळकर, कैलास शिंदे आदींनी केले आहे.