नगरसेवक खरात यांना अपात्र करण्याची मागणी

0

भुसावळ । भाजपा नगरसेवक रविंद्र खरात यांना सात अपत्ये असून ते निवडणूक लढविण्यास पात्र नसतांना बेकायदेशिररित्या निवडणूक लढविल्यामुळे त्यांना अपात्र करण्यासाठी कायदेशिर मुद्यांच्या आधारावर महाराष्ट्र म्युनिसिपल नगरपंचायती कायद्याप्रमाणे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक डिगंबर सोनवणे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली आहे.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप
खरात हे नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांना 2001 नंतर जन्मास आलेल्या अपत्यांची संख्या सात आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक चार अ या राखीव जागेसाठी नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्रात सात अपत्य असल्याचे कबूल केले आहे तसेच एक अपत्य हे 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्मास आल्याचे कबूल केले आहे. खरात यांची पत्नी रजनी खरात यांनी सुध्दा प्रभाग तीन ब या जागेसाठी भाजपाकडून नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यात त्यांनी शपथप त्रात सात अपत्ये असल्याचे आणि एक अपत्य 2001 नंतर जन्मास आल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नगरपंचायती कायद्यातील तरतुदींचा विचार केला असता खरात हे नगरसेवक पदावर राहण्यास पात्र नाही. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी खरात यांचे नामनिर्देशन पत्र राजकीय दबावापोटी मंजूर केले असल्याचा आरोप बाळा सोनवणे यांनी केला आहे. तसेच खरात यांच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे अपराध असून ते गैरमार्गाने निवडून आले असल्यामुळे त्यांना अपात्र करण्याची मागणी सोनवणे यांनी केली आहे.