नगरपालिकेनंतर आता तालुक्यात भाजप विरूध्द जनाधारचा सामना

0

भुसावळ (चेतन चौधरी) : नगरपालिका निवडणुकीनंतर आता पं.स. आणि जि.प. निवडणुकीच्या माध्यमातून भाजप विरूध्द जनाधार म्हणजेच पर्यायाने संजय सावकारे आणि संतोष चौधरी या आजी-माजी आमदारांमध्ये सामना रंगणार आहे. भुसावळातील विजयाने भाजपा आत्मविश्‍वाद दुणावला असून दुसरीकडे तालुक्यातील आपले स्थान मजबूत करण्यासाठी जनाधार संपूर्ण तयारीनिशी या निवडणुकांमध्ये उतरणार असल्याचे दिसून येत आहे. अर्थात दोन्ही ठिकाणी जोरदार लढत होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

भाजपात पुन्हा नव्या-जुन्याचा वाद – आमदार संजय सावकारे यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी देखील आमदार सावकारेंसोबत भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसतर्फे निवडून आलेले सदस्य हे देखील भाजपाच्या गोटात शामील होऊन ते देखील भाजपाकडून उमेदवारी लढविण्यास इच्छूक आहेत. इतर पक्षातील अनेक गाव पुढारी देखील भाजपाच्या संपर्कात आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष पक्ष श्रेष्ठीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे पक्षाशी एकनिष्ठ, प्रामाणिक पडत्या काळात साथ देणार्‍या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी. असा सूर भाजप गोटातून उमटत आहे. ऐनवेळी पक्षात प्रवेश करणार्‍यास उमेदवारी दिल्यास पक्षातंर्गत नाराजी सुध्दा वाढणार आहे. राजकीय घडामोडींमुळे ग्रामीण भागात वातावरण ढवळून निघत आहे.

चौधरी समर्थकांचे वर्चस्व
भुसावळ नगरपालिकेसह तालुक्यातील विविध सत्ताकेंद्रांवर माजी आमदार संतोष चौधरी यांचेच वर्चस्व होते. अजूनही बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये चौधरी समर्थकांच्या हाथी सत्ता आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेचे कुर्‍हा- वराडसिम, हतनूर- तळवेल, साकेगाव- कंडारी असे तीन गट असून तिन्ही गट चौधरी समर्थकांच्या ताब्यात आहे. तर एकूण आठ गणांपैकी सहा गण राष्ट्रवादीच्या व खडका, सुनसगाव हे दोन गण भाजपच्या ताब्यातील आहेत. त्यामुळे भाजपाकडे केवळ एक गट, दोन
गण आहेत.

चौधरींसाठी शेवटची संधी
भुसावळ नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या रुपाने नगरपालिकेत कमळ फुलले. यावेळी जनाधार पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन चौधरी यांना पराभव पत्कारावा लागला मात्र आता तीन महिन्यातच माजी आमदार चौधरी यांना पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीत आपली कामगिरी दाखविता येणार आहे. माजी आमदार चौधरी यांनी पालिका निवडणूकीदरम्यान जनाधार विकास पार्टीची स्थापना करुन आगामी सर्व निवडणूका देखील या कपबशी या चिन्हावरच लढविल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले असून नगरपालिका तर गेली मात्र आता ग्रामीण भागाचे सत्ताकेंद्र समजल्या जाणार्या पंचायत समितीवर वर्चस्व सिध्द करण्याची शेवटची संधी असून भाजपाच्या विजय रथाला जनाधार पार्टीचा अडथळा राहणार असल्याचे दिसून येते. भाजपातर्फे इच्छूक उमेदवार-भाजपतर्फे पंचायत समिती गणात- कुर्‍हे गणासाठी विद्यमान सभापती राजेंद्र चौधरी, सुनिल महाजन, किण चोपडे, प्रदीप भारंबे, किरण कळसकर, योगेश पाटील, गोपाळ बरकले, वराडसिम गणासाठी विद्यामान पंचायत समिती सदस्या मनिषा पाटील, माधुरी वाणी, योगिता ढाके, हतनूर गणासाठी पंचायत समिती सदस्या अलका पारधी, बापू सोनवणे, सरपाली कोळी, राजेंद्र वाघ, सुरेखा कोळी, तळवेल गणासाठी सुधाकर सुरवाडे, शशिकांत भास्कर, आका मेढे, साकेगाव गणासाठी माधुरी पाटील, मगला भोळे, अनिता भोई तर कंडारी गणासाठी चेतना भिरुड यांचे नाव आहे. तर जिल्हा परिषदेचा विचार करता कुर्‍हे- वराडसिम गटातून पल्लवी सावकारे, छाया जोहरे, अलका सपकाळे, मनीषा सुरवाडे, भारती पचेरवाल, हतनूर-तळवेल गटातून तालुका सरचिटणीस नारायण कोळी यांच्या पत्नी निर्मला कोळी, कविता तायडे, नजमा तडवी, वंदना उन्हाळे, प्रतिमभा तायडे, सुरेखा कोळी तर साकेगाव कंडारी गटातून चुडामण भोळे, विद्यमान पंचायत समिती उपसभापती मुरलीधर पाटील, यशवंत मोरे यांचे नाव आहे. तर दुसरीकडे संतोष चौधरी यांच्या गटातर्फे अद्याप उमेदवारांची नावे समोर आली नाहीत.