नगरदेवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

0

नगरदेवळा । येथील पाटील मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प. गट व गणातील उमेदवारांचा प्रचार कार्याचा शुभारंभ म्हणून आज नगरदेवळा- बाळद जि.प. गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यामध्ये आमदार सतिश पाटील, रा.काँ. अल्पसंख्यांक राज्य अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, माजी आमदार दिलीप वाघ, महिला जिल्हा अध्यक्ष विजया पाटील, कल्पना अहिरे, नितीन तावडे, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटीलसह अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात अरूणभाई गुजराथी यांनी सत्तारुढ पदाचा चांगला समाचार घेऊन सांगितले की, अच्छे दिनचे स्वप्न भंगले असून शेतकरी हिताचा कोणताच निर्णय नाही. शरद पवार कृषीमंत्री असतांना भारतातील सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले होते. आता फक्त उद्योगपतींचे 4 हजार कोटींचे कर्ज माफ झाले असून सरकार शेतकरी हित न पाहता उद्योगपतीचे भले करीत असल्याचे सांगितले.

आघाडी नेत्यांकडून सत्ताधार्‍यांवर जोरदार टिका
आमदार सतिश पाटील यांनी नोटाबंदी हे देशापुढील आणीबाणीपेक्षा ही मोठे संकट असून कॅशलेस व्यवहार ही लोकांची दिशाभूल आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सध्याची शिवसेना विसरली असून जुनी शिवसेना संपली व खाऊ सेना वाढली असून स्वत:चा विकास पक्ष भकास अशी स्थिती आली आहे. सेना स्वाभिमान विसरून युतीच्या गोष्टी करते येथे जर स्व. बाळासाहेब असते तर भाजपाला कधीच लाथ घातली असती. तर हाजी गफ्फार मलिक म्हणाले की, मुठभर जातीयवादी लोकांनी विषारी प्रचार करून सत्ता मिळवली असून धर्माच्या नावाने राजकारण करून देशाची दिशाभूल केली जात आहे. हा देश संविधान पाळणारा असून सर्व धर्म समभाव हिच देशाची ओळख आहे. सदर मेळाव्याला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रस्ताविक शिवनारायण जाधव यांनी केले. मंचावर राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश जाधव, गणातील मंगला पवार, शिवदास ठाकरे सह योगेश देसरे, विनय जकातदार, खलील देशमुख, शाम भोसले, गनीशेठ, हबीबशेठ, राजु महाजनसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलन राजेंद्र पवार यांनी केले.