नक्षलवादाविरोधात केंद्र सरकारची मोहीम

0

नवी दिल्ली: सुकमामध्ये नक्षलवादी हल्ल्यात 25 जवान शहीद झाल्यानंतर केंद्र सरकारने आता नक्षलवादाविरोधात मोहीम सुरू केली आहे. यानुसार नक्षलवादग्रस्त राज्यांमधील जिल्हा पोलीस दलांना सैन्याचे जवान प्रशिक्षण देणार आहेत. याशिवाय नक्षलवादग्रस्त भागात सुरक्षा दलाच्या मदतीसाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहे.

छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारला जाग आली असून नक्षलवादग्रस्त भागातील जिल्हा पोलीस दलामधील जवानांना सैन्याकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच नक्षलवादग्रस्त भागांमध्ये सीआरपीएफऐवजी भारतीय राखीव बटालियनची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.

सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशभरातील 10 नक्षलवादग्रस्त राज्यांमधील अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत दोन प्रमुख मुद्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये पहिला मुद्दा हा नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांमधील सुरक्षा व्यवस्था आणि दुसरा मुद्दा नक्षलवादग्रस्त भागांचा विकास हा असणार आहे.

नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील जवानांना भारतीय सैन्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या पथकांमध्ये नक्षलवादाचा मार्ग सोडून पोलीस खात्यात भरती झालेले तरुण आणि ग्रामस्थांचाही समावेश असतो. केंद्र सरकारने नक्षलवादाविरोधात थेट सैन्याला मैदानात उतरणावर नाही अशी भूमिका घेतली आहे. याऐवजी सैन्यामार्फत प्रशिक्षण देणे तसेच नक्षलवादग्रस्त भागात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या फेर्‍या वाढवण्यात येणार आहे. नक्षलवादग्रस्त राज्यांनी तातडीने त्यांच्या भागांमध्ये तात्पुरते तळ उभारावे, या तळावर हेलिकॉप्टरचे लँडीग करता येईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे. याशिवाय केंद्र आणि नक्षलग्रस्त राज्यांमधील समन्वय वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. राज्य पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम राबवण्याची गरज असून राजनाथ सिंह यासंदर्भात बैठकीत राज्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा करतील असे सूत्रांनी सांगितले.