नऊ वर्षिय बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधामाला चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

0

जळगाव : नऊ वर्षीय बालिकेवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी 2016 मध्ये धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या खटल्यात आरोपी नरेंद्र पाटील (30) आव्हाणी याला दोषी धरून न्यायालयाने चार वर्ष सक्तमजुरी तसेच एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायालयाचे न्या. आर.जे. कटारिया यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.

बालिकेच्या घरात घुसून केला होता अत्याचार
30 जुलै 2016 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पीडित बालिका घरात एकटी असताना नरेंद्र पाटील याने तिच्या घरात येवून बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडितेच्या आईने पाळधी दूरक्षेत्र अंतर्गत धरणगाव पोलीस स्टेशनला 01 ऑगस्ट 2016 रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार गुरनं 108/2016 भादंवि कलम 354 ब, 452 व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 7 व 11 (1) अन्वये संशयित आरोपीविरोधात धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास सहायक पोेलीस निरीक्षक पी.के. सदगीर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

असे कलम… अशी सुनावली शिक्षा
खटल्याचे कामकाज जळगाव सत्र न्यायालयात न्या. आर.जे. कटारिया यांच्या समोर चालले. सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित, पीडितेची आई, दीपक बाबूराव पाटील, डॉ. विकास प्रल्हाद पाटील, डॉ. शेख असिफ इकबाल व तपासी अंमलदार पी.के. सदगीर तर संशयितातर्फे बचावाचे साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्याचे कामी पीडित अल्पवयीन मुलीची साक्ष ही खूप महत्त्वपूर्ण ठरली. समोर आलेल्या साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने आरोपीला दोषी धरून भादंवि कलम 354 ब, 452 खाली प्रत्येकी एक वर्ष व प्रत्येकी 500 रूपये दंड तर लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 7 खाली 04 वर्ष सक्तमजूरीची व 1000 रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले. याकामी पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरीक्षक शालीग्राम पाटील यांनी मोलाची मदत केली.

Copy