नंदुरबार-सुरत मेमूतून ढकलल्याने नंदुरबारच्या युवकाचा मृत्यू

मुलींच्या छेडखानीतून घटना घडल्याचा संशय : आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा ; पोलिसांनी केली तरुणाला अटक

भुसावळ/विसरवाडी : नंदुरबार-सुरत मेमूतून ढकलल्याने नंदुरबारच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, 20 रोजी नंदुरबार-सुरत रेल्वे मार्गावर केलपाडा, ता.नवापूर शिवारात घडली. या घटनेत फरहाज हाजी मोबीन कुरेशी (17, रा.कुरेशी मोहल्ला, नंदुरबार) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर संशयीत आरोपी संदीप गणेश वळवी (केलपाडा, ता.नवापूर) या संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे. मुलींच्या छेडखानीवरून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

वादानंतर तरुणाला मेमूतून ढकलले
नंदुरबार-उधना मेमू ही सोमवार, 20 रोजी निघाल्यानंतर नवापूर तालुक्यातील केलपाडानजीक तरुणींच्या छेडखानीवरून युवकांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद काही वेळेत मिटल्यानंतर फरहाज कुरेशी व अब्रार शेख हे मेमूच्या दरवाजाजवळ बसले असताना संशयीत संदीप वळवी व दरवाजात बसलेल्या दोघांमध्ये झटापट झाली व संदीपने फरहाज कुरेशीला दरवाजातून ढकलल्याने पुलाखाली पडून त्याचा मृत्यू झाला तर अब्रार हा बाजूला झाल्याने तो वाचला. प्रवाशांनी यावेळी धोक्याची साखळी ओढत आरोपी संदीपला पकडून ठेवत चिंचपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार, नवापूर, विसरवाडी येथील मयताच्या नातेवाईकांनी गर्दी करीत आक्रोश केला. उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, विसरवाडीचे सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेप्रकरणी अबरार कुरेशी शेख अस्लमरा (कुरेशी मोहल्ला, नंदुरबार) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी संदीप गणेश वळवीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाने गस्त वाढवावी
धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये तरुणींची छेडखानी होण्याचे प्रकार वाढले असून रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी गस्त घालून या प्रकारांना पायबंद घालावा, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.